महाराष्ट्र

Bacchu Kadu : तिरंगा शानाचा , पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या मानाचा

Independence Day : बळीराज्यासाठी प्रहारचा आंदोलनात्मक फडकाव

Author

शेतकरी कर्ज माफीसाठी बच्चू कडू यांनी हर घर तिरंगा उपक्रमासोबत हर घर किसान अभियानाची मागणी केली आहे.

देशभरात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू झाली असताना, एक वेगळाच आवाज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गगनात घुमू लागला आहे. केंद्र सरकारकडून 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येतोय. मात्र या उपक्रमात केवळ देशप्रेम व्यक्त करून भागणार नाही, तर देशाच्या खऱ्या शिल्पकाराला, म्हणजेच शेतकऱ्याला सन्मान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ठाम मत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मांडले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. हजारो शेतकऱ्यांची आशा-निराशा, आंदोलने, पायी दिंड्या, संघर्ष या सगळ्यांतूनही अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.

सरकारकडून आश्वासनांची खैरात होत असली, तरी जमिनीवर त्याचे प्रतिबिंब मात्र दिसत नाही. यामुळे संतप्त बच्चू कडूंनी या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी ‘हर घर किसान’चा नवा नारा देत आंदोलनाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी हा देशाचा खरा हिरो आहे. जिथे घरात राष्ट्रध्वज फडकवला जातोय, तिथेच एक पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थही फडकवा. त्या झेंड्यावर लिहा जय जवान, जय किसान! असा उपदेश बच्चू कडूंनी केला आहे. त्यांनी या आंदोलनाचे रूपांतर जनआंदोलनात व्हावे यासाठी जनतेला भावनिक साद घातली आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंग्यासोबत शेतकऱ्यांचा पांढरा झेंडा लावून एकजुटीचा संदेश द्यावा.

Devendra Fadnavis : अफाट डिजिटल युगात, वाहणार फास्ट महसूल सेवा

जनतेचा पाठिंबा

पांढऱ्या झेंड्याचा रंग शांतीचा, सन्मानाचा आणि स्वच्छ हेतूचा प्रतिक आहे. ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय अभियानाच्या जोडीला ‘हर घर किसान’च्या माध्यमातून शेतकऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा बच्चू कडू यांचा हेतू आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जाच्या विळख्यातील अडचणी आणि शेतमालाला न मिळणारा योग्य दर या सगळ्या समस्या सरकारला वारंवार दाखवूनही अद्यापही कर्जमाफीच्या निर्णयात गती दिसून आलेली नाही. अनेक शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. तर काहींनी जग सोडून दिले. हे वास्तव अधिक वेदनादायक आहे.

बच्चू कडूंनी विचारलेला प्रश्न सरकारला अजून किती वेळ लागणार आहे शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यायला? हा फक्त राजकीय प्रश्न नाही, तर सामाजिक विवेकाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य दिनी ध्वज फडकवत असताना या प्रश्नाचे उत्तर शोधणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.देश साजरा करत असलेल्या 79 स्वातंत्र्य दिनी, शेतकऱ्यांचे दुःख, संघर्ष आणि प्रतिष्ठा यांचा विचार करण्याचा हा योग्य क्षण आहे. बच्चू कडू यांच्या हर घर किसान मोहिमेमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता या आवाजाला जनतेचा पाठिंबा मिळतो का? सरकारकडून काही ठोस पावले उचलली जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vijay Wadettiwar : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसने घेतली मोठी भरारी

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!