
नागपूर दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नागपूर शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फहीम खानने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावर राजकीय दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप करत, निर्दोष असल्याचा दावा त्याने याचिकेत केला आहे. सोमवारी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

फहीम खानला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. खानला गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र, त्याने आपल्यावरील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असून, केवळ एफआयआरमध्ये नाव आल्यामुळे त्याला दोषी ठरवू शकत नाही, असे म्हणत जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.
हिंसाचाराचे सूत्रधार
पोलिसांच्या तपासानुसार, झालेल्या दंगलीचा सूत्रधार म्हणून फहीम खानचे नाव समोर आले. त्याने मोठा जमाव गोळा करून, गणेशपेठ पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या घटनेनंतर काही तासांतच शहरात तणाव वाढला आणि अचानक हिंसाचार भडकला. या प्रकरणात पोलिसांनी पन्नासहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून, अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष असलेल्या फहीम खानवर दंगल भडकविण्याचा आरोप आहे. त्याने आपल्या समर्थकांना भडकावल्यामुळेच जमावाने रस्त्यावर उतरून हिंसाचार केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांधीगेट परिसरात काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केले होते. त्या कबरीवर हिरव्या रंगाची चादर होती, ज्यावर धार्मिक आयत लिहिल्या असल्याचे म्हटले जात आहे. याच मुद्द्यावरून फहीम खानने आपल्या समर्थकांना भडकवून, वातावरण तापवले. फहीम खान स्वतः गणेशपेठ पोलीस ठाण्यात गेला आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून कठोर कारवाईची मागणी केली. त्याच्या मागे पन्नासहून अधिक समर्थकांचा जमाव होता. त्यानंतर हे लोक गांधीगेट परिसरातून जात असताना त्यांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे तणाव वाढत गेला आणि काही तासांतच परिस्थिती हाताबाहेर गेली.
न्यायालयीन लढाई
फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात ठोस पुरावे सादर केले आहे. दंगल भडकविण्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. त्याच्याविरोधात अनेक व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी पोलिसांकडे आहेत. प्रशासनाच्या वतीने ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित नाही. नागपूर शहराच्या सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.