
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विरोधकांना कठोर प्रत्युत्तर देत सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केल्याचा पुनरुच्चार केला.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत विरोधकांना ठाम प्रत्युत्तर दिले. राज्यात काहीही घटना घडली की काही लोक माझा सगेसोयरा शोधतात, पण मी गृहविभागाचा प्रमुख म्हणून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केली आहे. माझा सगा भारताचं संविधान आहे. माझे सोयरे 13 कोटी महाराष्ट्रातील जनता आहे. अन्याय करणाऱ्याला कोणतेही झुकते माप नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर भाष्य करताना विरोधकांवर जोरदार टीका केली. इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या इतिहासात इतका मोठा प्रस्ताव कधीच नव्हता. त्यातील अर्ध्या विषयांवर कुणीही बोलले नाही. विरोधकांनी आपल्या भूमिकेत स्पष्टता ठेवली पाहिजे. त्यांना जर विरोधक म्हणून कसे काम करायचे हे शिकायचे असेल, तर मी स्वतः प्रशिक्षण देण्यास तयार आहे. गरज भासल्यास छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही मदत घेईन, असे मिश्किल विधान करत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला.
तिखट शब्दांत वार
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना स्पष्ट केले की, कुंपनच शेत खातंय, असे काही लोक म्हणतात. पण आमच्या शेताला कुंपनच नाही! आमचं सरकार सर्वांसाठी खुलं आहे. कोणीही मुक्तपणे, निर्भयपणे आमच्या शेतात येऊ शकतो. आम्ही पारदर्शक आणि सक्षम व्यवस्थापनावर विश्वास ठेवतो.
तेलंगणामध्ये लपून बसलेल्या कोरटकरच्या अटकेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, तो कुठे लपून बसला होता? कुणाच्या घरी होता? आम्ही कोणताही राजकीय विचार न ठेवता कठोर कारवाई केली. शिवाजी महाराजांवर कोणीही वाईट शब्द उच्चारल्यास कारवाई होणारच. ते आमचे दैवत आहेत, आणि त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही.
आव्हाडांवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काल आव्हाड साहेब लोकशाही कोसळल्याचे बोलत होते. पण ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते की बांगलादेशाबद्दल, हेच समजत नव्हते. त्यांनी निखिल भामरे, सुनयना होले, समीर ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, मदन शर्मा, कंगना राणावत, नारायण राणे, अर्णब गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी, अनंत करमुसे यांची नावे आठवावीत. त्या काळात सरकारने कायदा सुव्यवस्थेचे नावाखाली अनेक लोकांवर अन्याय केला. तेव्हा कुठे होती लोकशाही? असा तिखट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
राज्यातील सत्ताधारी युतीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न करा, आम्ही तिघे (मी, शिंदे आणि अजित पवार) एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही, तर हातात हात घालून सरकार चालवणार आहोत. अजित दादा थोडे दरडावून बोलतात. त्यामुळे त्यांच्या वाटेला फार कोणी जात नाही. आम्ही दोघे मवाळ, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहोत. त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार मजबूत राहील.
सहानुभूती कशासाठी?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दंगलखोर आणि गुन्हेगारांविषयी सहानुभूती दाखवणाऱ्या विरोधकांवरही निशाणा साधला. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधक आक्षेप घेत आहेत. पण त्याला फाशी झाली असती, हे त्यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. कायद्याने शिक्षा मिळालीच पाहिजे. पण अशा लोकांसाठी काहींना इतकी सहानुभूती का? दंगेखोर आणि बलात्कारींसाठी संवेदना दाखवणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी!”
फडणवीस यांच्या या सडेतोड उत्तरांमुळे सभागृहात प्रचंड खडाजंगी पाहायला मिळाली. त्यांच्या प्रत्युत्तरामुळे विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे उरले नाहीत. आता हे पहावे लागेल की, विरोधक पुढे कशा प्रकारे उत्तर देतात आणि युती सरकारवर कोणत्या मुद्द्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.