
दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. तिच्या वडिलांनी नव्या आरोपांनी प्रकरण अधिकच चिघळवले. आता हे प्रकरण आत्महत्या की हत्या, या प्रश्नाने गोंधळ उडविला आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात नवे आरोप आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत, तो सामूहिक बलात्कारानंतर करण्यात आलेली हत्या असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार देत काही बड्या नावांना आरोपी करण्याची मागणी केली आहे. अशात आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

तक्रारीत बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियो, व्यावसायिक सूरज पांचोली, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, तिच्या अंगरक्षकासह इतर काही व्यक्तींवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणातील नव्या दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा वेगळाच रंग चढू लागला आहे. या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खरोखरच हा एक कट होता का? की हे फक्त राजकीय खेळीचा भाग आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Sudhir Mungantiwar : अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बंधनांची चौकट हवी
आत्महत्या की हत्या?
मालवणी पोलिसांनी या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट काही दिवसांपूर्वीच सादर केला होता. या अहवालात दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, त्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा आर्थिक संकटात होती. तिच्यावर कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढत होत्या. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे ते वारंवार पैशांची मागणी करत होते.
सततच्या दबावामुळे ती मानसिक तणावात गेली होती. तिच्या मित्रांनाही तिने या गोष्टीची कबुली दिली होती. शेवटी त्या मानसिक तणावाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. सतीश सालियान यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांचा रिपोर्ट आणि दिशाच्या वडिलांचा दावा यामध्ये मोठा विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अडचणी वाढण्याची शक्यता
एका बाजूला त्यांनी न्याय मागण्यासाठी कोर्टात धाव घेतली असली, तरी पोलिसांच्या अहवालामुळे सतीश सालियान यांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या दिशाला वारंवार पैशांसाठी त्रास दिला जात होता, असे या रिपोर्टमध्ये नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सतीश सालियान यांचीही सखोल चौकशी होऊ शकते.
दिशाच्या मृत्यूप्रकरणावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणात सतत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीही त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या प्रकरणाचे फक्त राजकीय भांडवल केले जात आहे. त्यांनी भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. जर त्यांच्याकडे कोणते ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते समोर आणावेत. केवळ आरोप करून राजकीय फायद्यासाठी एका कुटुंबावर, एका नेत्यावर टीका करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिशा सालियान मृत्यूप्रकरण अजूनही एक गूढच आहे. पोलिसांनी आत्महत्येचा अहवाल दिला असला, तरी तिच्या वडिलांच्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी होईल का? बलात्कार आणि हत्येच्या आरोपांची सत्यता काय? आणि या सगळ्यामागे खरोखरच कोणाचा हात आहे? याबाबत लवकरच काही ठोस निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे.