देशातील जनतेकडून इंधन दराच्या नावाखाली सुरू असलेली खुल्लमखुल्ला लूट थांबवण्यासाठी काँग्रेसने आता थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका करत पेट्रोल-डिझेलवरील अन्यायकारक कर रचनेचा पर्दाफाश केला. पेट्रोलचा दर 51 रुपये आणि डिझेलचा दर 41 रुपये प्रति लिटरवर आणणे शक्य आहे. फक्त केंद्र सरकारने जनतेच्या हिताचा विचार करावा, अशी ठाम मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचा दर फक्त 65 डॉलर प्रति बॅरल आहे. तरीही देशात पेट्रोल 109 रुपये आणि डिझेल 93 रुपयांच्या घरात विकले जात आहे. ही कुठली अर्थनीती? ही तर सरळ सरळ झिजिया करासारखी जनतेवर लादलेली लूट आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात क्रूड ऑईलचा दर तब्बल 145 डॉलर प्रति बॅरल गेला होता. तरीदेखील पेट्रोल 70 रुपये आणि डिझेल 45 रुपये दराने मिळत होते. मात्र आज 65 डॉलरला क्रूड मिळत असूनसुद्धा केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, मोदी सरकार कररूपी दरोडा घालते आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Nitin Gadkari : नागपूरच्या मातीतून निघतोय शाश्वत विकासाचा महामार्ग
वाचला दराचा पाढा
सपकाळ यांनी आकडेवारी देत सांगितले की, यूपीए सरकारच्या काळात पेट्रोलवर फक्त 9.56 रुपये आणि डिझेलवर 3.48 रुपये इतका एक्साईज ड्युटी आकारली जात होती. मात्र, भाजपा सरकारने यामध्ये प्रचंड वाढ करत पेट्रोलवरील एक्साईज 32 रुपयांवर नेली आहे. याशिवाय एक रुपयाचा रोड सेस आता 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. टोल टॅक्स तर वेगळाच सुरू आहे. या सर्वांचा थेट भार सामान्य जनतेवर येतो आहे.
एलपीजी सिलिंडर दुप्पट
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, “एलपीजी सिलिंडर यूपीएच्या काळात 400 ते 450 रुपयांत मिळत होता. आज तो 950 ते एक हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आजच सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून, ही थेट घरखर्चावर आघात करणारी महागाई सरकारने थांबवावी. रशिया भारताला जागतिक दराच्या तुलनेत 30 टक्क्यांनी स्वस्त क्रूड ऑईल विकते. मात्र याचा फायदा सामान्य जनतेला मिळत नाही. उलट रिलायन्स आणि नायरा यांसारख्या खासगी कंपन्यांना हा स्वस्त क्रूड दिला जातो, त्या कंपन्या युरोपमध्ये हे क्रूड विकून अब्जोंचा नफा मिळवतात. सरकार यावर गप्प का? या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन सामान्य नागरिकांवर भार टाकण्याचे षडयंत्र सरकार रचते आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.
Banwarilal Purohit : माजी राज्यपाल मोदींबद्दल असे काही बोलले की…
‘सेलिब्रिटी’ कुठे गायब?
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल दोन रुपये वाढले तरी ट्विटरवर रडगाणे गाणारे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, बाबा रामदेव हे आता का गप्प आहेत? त्यावेळी 15 रुपयांनी दर वाढला तरी काहीजण आंदोलन करायचे. आता पेट्रोल 109 रुपयांवर गेले तरी कुणीच आवाज उठवत नाही. ही मौनसंमती जनतेविरोधातली आहे.
केंद्र सरकारने इंधन दरवाढीबाबत एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून गेल्या काही वर्षांत जनतेकडून किती महसूल गोळा केला गेला आणि तो कुठे खर्च झाला याचा हिशेब द्यावा, अशी स्पष्ट मागणीही सपकाळ यांनी यावेळी केली. कृषी सेस, रोड सेस, सेसवर सेस यांसारख्या कर रचनेच्या आड लपून जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा पर्दाफाश होणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आता तरी केंद्र सरकारने वास्तव समजून घेत पेट्रोलचा दर 51 रुपये आणि डिझेलचा 41 रुपये प्रति लिटरवर आणावा. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या सरकारने उद्योगपतींची नव्हे तर सामान्य जनतेची बाजू घ्यावी,” असा स्पष्ट इशारा देत सपकाळ यांनी ही पत्रकार परिषद संपवली.