
नव्याने संधी मिळालेल्या आमदार संदिप जोशी यांनी पुढाकार घेत विकासाकडे आपली वाटचाल सुरु केली आहे.
राजकारणात संधी मिळते, पण ती टिकवून ठेवण्यासाठी मेहनत आणि विश्वास आवश्यक असतो. नागपूरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत बरेच उलथापालथी झाल्या, मात्र ज्यांनी सातत्याने आपली निष्ठा आणि कार्यक्षमता सिद्ध केली, त्यांना पक्षाने नेहमीच योग्य संधी दिली आहे. याचाच जिवंत पुरावा म्हणजे नागपूरचे माजी महापौर संदिप जोशी. ते पुन्हा एकदा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. आमदार संदिप जोशी यांच्या पुढाकाराने नागपूर मनीष नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने आणि भाजपच्या नेतृत्वाच्या विश्वासाने, संदिप जोशी यांना नुकतेच विधान परिषद सदस्यत्वाची संधी मिळाली. त्यांच्यासाठी ही एक नव्याने झेप घेण्याची संधी होती. आपल्या प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नागपूरच्या मनीष नगर भागात भव्य भित्तिचित्र उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आठ एप्रिल रोजी पार पडले. यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संदिप जोशी यांचा सत्कार केला.
आराध्य दैवत
जोशी यांनी त्याबद्दल सांगितले की, शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांचे विचार हेच आपले मार्गदर्शन करतील. जोशी यांनी केवळ पक्षासाठी नव्हे, तर नागपूरच्या विकासासाठीही सातत्याने आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामामुळेच त्यांना हा मान मिळाला आहे. मागील विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव विसरून जोशी आता नव्या जोमाने कामाला लागले आहेत. त्यांची कार्यशैली, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा यामुळे ते पुन्हा स्टाईलमध्ये आले आहेत.
काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या विधान परिषद सदस्यांच्या यादीत संदिप जोशी यांना भाजपने मोठी संधी दिली होती. जोशी हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत आहेत. यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या त्या पराभवामुळे पहिल्यांदाच नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला होता या पराभवानंतर नागपूर भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचेही म्हटले जाते. नागपूर हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.
जोशींचा कार्यकाळ
काहींनी हा पराभव पक्षाच्या रणनीतीतील चुका म्हणून पाहिला, तर काहींनी स्थानिक नेतृत्वाच्या मतभेदांमुळे झालेली घटना मानली. मात्र, पक्षश्रेष्ठींचा संदिप जोशी यांच्यावर असलेला विश्वास कायम राहिला. त्यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. संदिप जोशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात मानद सचिव (Officer on Special Duty) म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा प्रशासनिक आणि राजकीय अनुभव मोठा आहे. विधान परिषदेत त्यांचा सहभाग केवळ भाजपसाठीच नव्हे, तर संपूर्ण नागपूरसाठी फायद्याचा ठरणार आहे.
नागपूरच्या राजकारणात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे वेगळे प्रभाव आहेत. काहींच्या मते, मागील पराभवामागे गडकरींच्या जोशींना कमी पाठिंब्याचा हातभार असल्याचेही सांगितले जाते. मात्र, आता फडणवीस यांच्या मजबूत पाठिंब्यामुळे संदीप जोशी पुन्हा राजकीय रणांगणात उतरले आहेत. भाजपने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरणार का? हा प्रश्न येत्या काळात सुटेल, मात्र संदिप जोशींच्या पुनरागमनाने नागपूरच्या राजकारणात नवा रंग भरला आहे, हे निश्चित.