
नागपूर येथे झालेल्या पोलिस पाटील मार्गदर्शन मेळाव्यात भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपस्थिती लावून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात त्यांनी मानधन, वयोमर्यादा आणि प्रशिक्षणासंदर्भात आश्वासक भूमिका मांडली.
संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील पोलिस पाटलांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळावा हा केवळ एक शिबिर नव्हता, तर पोलिस पाटलांच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि अधिकारासाठी चाललेल्या लढ्याचे प्रतिबिंब होता. या मेळाव्यात भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांचे मन जिंकले. रामटेकचे SDO महाजन, कायदे सल्लागार ॲड. संदीप तिवारी यांच्यासह राज्याध्यक्ष नंदु खिवसे पाटील आणि जिल्हाभरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डॉ. फुके यांनी आपल्या भाषणातून पोलिस पाटलांप्रती असलेली कृतज्ञता आणि आत्मीयता व्यक्त करतानाच, त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मानधन वाढीच्या निर्णयाची आठवण करून देत, पोलिस पाटलांच्या सातत्यपूर्ण मदतीमुळेच भाजपला यश मिळाल्याचे ठामपणे सांगितले.
मागणीवर सकारात्मक पावले
पोलिस पाटलांमुळे झालेली मदत विसरणे अशक्य आहे, असे सांगत डॉ. फुके यांनी सांगितले की, जेव्हा भंडारा जिल्ह्याच्या टीमने मानधन वाढीची मागणी केली, तेव्हा ते 3 हजार रुपये होते, परंतु आपण त्यात सातत्याने वाढ करत 15 हजार रुपयांपर्यंत नेले. ही केवळ रक्कम नव्हे, तर पोलिस पाटलांच्या कष्टाची आणि कार्यक्षमतेची ओळख आहे.
सध्या प्रशिक्षण सुरू असल्याने मानधनात तात्काळ वाढ शक्य नसल्याचे स्पष्ट करत, फुके यांनी सांगितले की, वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीचा विषय ते या अधिवेशनात मांडणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा केल्याचेही सांगितले. हा विषय गंभीर असून लवकरच सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न केले जातील.
दीर्घकालीन संघर्षाची हमी
डॉ. फुके यांनी सांगितले की, ते राज्यात कुठेही गेले तरी गावागावातील पोलिस पाटलांचा विश्वास त्यांना जाणवतो. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यातील या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मुंबईहून विशेष उपस्थिती लावली. मी तुमच्यातलाच आहे, हा भाव त्यांच्या शब्दांतून स्पष्ट दिसून आला.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, प्रत्येक पाच वर्षांनी मानधन वाढवण्याचा शब्द त्यांनी दिला आहे आणि तो पाळला जाईल. पोलिस पाटलांच्या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारदरबारी लवकरच ठोस निर्णय घेतले जातील. हा पैसा जनतेचा आहे, आणि पगार वाढला की जबाबदारीही वाढेल, या त्यांच्या स्पष्ट वाक्याने प्रामाणिक आणि पारदर्शक राजकारणाची झलक मिळाली.
न्यायाची जबाबदारी स्वीकारली
शिवाजीराव कोलते, परशुरामकर, राहुल उईके, अशोक गेडाम, सुधाकर साटोने, योगेश मते, राजेश बनसोड यांसारख्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमाचे संयोजन व यशस्वी आयोजन हे एकता, समन्वय आणि नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण ठरले.
डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीने हा मेळावा अधिक परिणामकारक ठरला. पोलिस पाटलांचे अधिकार, सन्मान आणि भविष्यातील सुरक्षेचा प्रश्न त्यांनी हृदयपूर्वक हाताळला. त्यांच्या या भूमिकेमुळे एक आश्वासक राजकीय चेहरा लोकांसमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.