
उपराजधानीत झालेल्या हिंसेप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी हमीद इंजिनियर याला अखेर नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नागपूरच्या भालदारपुरा परिसरात 17 मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा हमीद इंजिनियर याला अखेर नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ओझा यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हमीदला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीनावर मुक्त करण्यात येणार आहे. सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर 21 एप्रिलरोजी उशीर झाल्यामुळे हमीदची अधिकृत सुटका उद्या सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून होणार आहे.

हमीद यांना धार्मिक हिंसाचार भडकावण्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी त्याच्या सोशल मीडियावरील विधानांमुळेच जमाव भडकला, असा युक्तिवाद केला होता. हमीद इंजिनियर हे अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्याच्यावर सोशल मीडियावरून लोकांना भडकवण्याचा आणि हिंसाचाराचे कट रचल्याचा आरोप आहे. हिंसाचाराच्या दिवशी त्याने जनतेमध्ये भीती निर्माण करणारी वक्तव्ये केली, अशी माहिती समोर आली आहे. ही वक्तव्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती.
मास्टरमाइंडचा आरोप
विशेष म्हणजे, त्याच विधानांचा हवाला देत काहींनी लोकांकडून देणग्याही मागविल्या होत्या. हमीदचा एक मित्र फहीम, ज्याला हिंसाचाराचा मास्टरमाइंड म्हटलं जात आहे. त्यालाही यापूर्वीच अटक झाली आहे. फहीमने कथितपणे दंगलीच्या काही तास आधी जमावाला भडकवले होते. त्याने पोलीस ठाण्याजवळ अल्पवयीन मुलांना जमवले होते, असा पोलिसांचा दावा आहे. यामुळे दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. फहीम खानच्या अटकेनंतर हमीद यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हमीद म्हणाला होता की फहीम निर्दोष आहे. त्याच्या अटकेला कोणताही ठोस आधार नाही.
फहीम खान यांनी स्पष्टपणे सांगितले होते की पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर हमीदच्या स्वतःच्या अटकेनंतर त्याच्या जामिनासाठी न्यायालयात सुनावणी झाली. सायबर पोलिसांनी या सुनावणीत केस डायरी सादर केली होती. पोलिसांनी युक्तिवाद करत हमीदविरोधात ठोस पुरावे दाखवले होते. नागपूरच्या भालदारपुरा भागात उसळलेल्या हिंसाचाराने फक्त विरोधी गटांचेच नव्हे तर स्वतःच्या गटाचेही मोठे नुकसान केले. दंगलखोरांनी पोलिसांवर थेट हल्ले केले आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.
हिंसा नियंत्रणात आणताना पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला. यामध्ये भालदारपुरा भागातील अनेक सामान्य नागरिकांना पोलीस कारवाईचा फटका बसला. या प्रकरणाचा पोलिसांकडून सातत्याने तपास सुरू होता. पोलिसांनी आणखी काही आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू केली होती. नागपूर पोलिस आणि सायबर सेल दोघं मिळून सोशल मीडियावरील संदेश, व्हीडिओ आणि कॉल रेकॉर्ड्स यांचाही तपास सुरू होता.