
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरांमधील वाहतूक सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापनेची घोषणा त्यांनी केली आहे.
शहरी वाहतूक व्यवस्थेतील मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. या समस्येचा शाश्वत आणि किफायतशीर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरांमधील वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अडचणींवर मात करण्यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शहरांतील वाहतूक सेवा सुसूत्रित करण्यासाठी, प्रवाशांना सोयीस्कर आणि जलद सेवांचा अनुभव देण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याच्या उद्देशाने बैठक घेतली. या प्राधिकरणाचा मुख्य हेतू विविध वाहतूक सेवांच्या समन्वयात सुधारणा करणे आणि नागरिकांना सुकर, सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे आहे. यामध्ये राज्य परिवहन महामंडळ, महापालिका, मेट्रो, रेल्वे या सर्व वाहतूक यंत्रणांच्या सेवांचा समावेश होईल. फडणवीस यांच्या नेतृत्वात यासाठी कार्यान्वित होणारी एकात्मिक योजना महानगरांमधील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकते.
एकात्मिक प्राधिकरणाची रचना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्राधिकरणाच्या रचनेत महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. या प्राधिकरणात सर्व महानगरपालिकांचे महापौर आणि आयुक्त यांचा समावेश असावा. ज्यामुळे शहरातील वाहतूक सेवांचे नियोजन आणि अंमलबजावणी सहज होईल. प्राधिकरण हा केवळ नियोजन आणि विकासाची जबाबदारी घेईल. तर वाहतूक सेवा अंमलबजावणी संबंधित महापालिकेकडे राहील. याशिवाय, एकात्मिक प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध वाहतूक सेवांचा एकसमान भाडे संच, शहरांमधील चालू असलेले प्रकल्प, तसेच विविध वाहतूक प्रकल्पांच्या समन्वयासाठी एकच नियामक यंत्रणा तयार केली जाईल.
नागरिकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सहज आणि सुकर सेवा मिळू शकतील. प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा भाग म्हणून, इज ऑफ लिव्हिंगला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सार्वजनिक वाहतूक प्रणालीला अधिक कार्यक्षम बनवणे, त्यासोबतच वाहतूक कोंडी कमी करणे, या सर्व बाबी फडणवीस यांच्या धोरणांचा भाग आहेत. सध्या, वेगवेगळ्या महानगरांमध्ये विविध वाहतूक यंत्रणांचा समन्वय न होण्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यावर त्वरित उपाय म्हणून, एकात्मिक वाहतूक प्राधिकरण ही एक क्रांतिकारी पावले ठरू शकते.
Chandrashekhar Bawankule : नागपुरातील वीज कामगारांना मिळणार घरे
आगामी पावलांचे नियोजन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. प्राधिकरणाचे कार्य अधिक प्रभावी बनवण्यासाठी एक स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नियुक्त केला जाईल. यामुळे प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही गोंधळ होणार नाही. त्याचे कार्य अधिक सुसंगत होईल. तसेच, शहरांमध्ये चालू असलेले परिवहन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी एकच नियामक यंत्रणा तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे महानगरांमधील वाहतूक सेवेतील समन्वयाची समस्या निराकरण होईल. नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक सुविधा मिळू शकतील.
सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अप्पर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांनी उपस्थिती दर्शविली. ही बैठक आणि चर्चा प्राधिकरणाच्या कामकाजाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. पुढील टप्प्यात कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल.