
पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असताना केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र अशा निर्णायक क्षणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असताना, केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करून पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले. अशा निर्णायक क्षणी देशहितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे होते. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधी या महत्त्वपूर्ण बैठकीत अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर बोलताना स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, पहलगामसारखा गंभीर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्व भारतीयांनी आणि विशेषतः राजकीय पक्षांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकसंघ भूमिका घ्यायला हवी. अशा वेळी राजकारण करणं ही अतिशय खालची पातळी आहे. फडणवीस पुढे म्हणाले, बांगलादेश युद्धाच्या काळात अटलजींनी इंदिरा गांधींना निःसंशय पाठिंबा दिला होता. तेव्हाही देशात राजकीय मतभेद होते, पण जेव्हा देशावर आघात झाला, तेव्हा राजकारण बाजूला ठेवलं गेलं. आज मात्र केवळ अहंकारातून, अपरीपक्वतेतून विरोध करणं, बैठकीला अनुपस्थित राहणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. देशाची जनता हे विसरणार नाही.
BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे
लोकप्रतिनिधी अनुपस्थित
दिल्लीमध्ये झालेल्या केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे कोणतेही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते, तरीही ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिले. संसदेतील फ्लोअर लीडर अरविंद सावंत यांनी सरकारला एक पत्र पाठवून ‘अपरिहार्य कारणांमुळे’ उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले. त्याचबरोबर त्यांनी सरकारला पाठिंब्याचं पत्र दिलं असलं, तरी बैठकीत अनुपस्थित राहणं हे गंभीरपणे पाहिले जात आहे.
राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, अशा संवेदनशील प्रसंगी फक्त पत्र पाठवून जबाबदारी पार पडत नाही. उपस्थित राहून देशहिताच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. ठाकरे गटाची अनुपस्थिती ही एक पळवाट असल्याचं अनेकांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी थेट हल्लाबोल करत म्हटलं, राजकारणात विरोधाची जागा असते, पण जेव्हा देशावर हल्ला होतो. तेव्हा पक्ष न पाहता राष्ट्र प्रथम हेच धोरण असलं पाहिजे. आज जे काही विधानं केली जात आहेत, ते मुर्खपणाचं लक्षण आहे. देशवासीय हे सगळं लक्षात ठेवतात. आज जे चाललंय, त्याला जनता कधीच माफ करणार नाही.
सवाल राष्ट्रहिताचा
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ पावलं उचलली आहेत. विशेष विमानांच्या मदतीने त्यांना महाराष्ट्रात आणण्यात येत आहे. यासाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. देशावर संकट कोसळलं असताना एकमेकांवर दोषारोप न करता, सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रहिताच्या दृष्टीने काम करणे ही काळाची गरज आहे. फडणवीसांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर हे राजकारणाचा वेळ नाही, हे राष्ट्रहिताचं युद्ध आहे. आणि या युद्धात मागे राहणाऱ्यांची जनता स्वतः निर्णय घेईल.