
सत्ताधारी आमदारानेच महाराष्ट्र पोलिसांना अक्षम म्हटल्यानं सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जे आमदार आतापर्यंत पोलिसांच्या सुरक्षा कवचात होते, त्यांना अचानक आता तेच पोलिस ‘होपलेस’ वाटू लागले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी विचार करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील काही नेते वाचाळवीर म्हणून ओळखले जातात. ते कधी कोणाबद्दल अन् काय बोलतील हे सांगताच येत नाही. यापैकी अनेक नेत्यांना राजकारणात सखोल अभ्यासही नाही. पण टीव्हीवर सतत झळकण्याच्या आणि टीआरपीच्या नादात ही मंडळी उलटसुलट वक्तव्य करत सुटतात. अशा राजकीय मंडळींची महाराष्ट्रात कमतरता नाही. असेच काहीचे वादग्रस्त वक्तव्य करीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वत:च्याच सरकारला लाथाडले आहे. आपल्याच सरकारच्या नियंत्रणात असलेला एक विभाग कसा ‘होपलेस’ आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

शिवसेनेचे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी या वक्तव्यातून खळबळ उडवून दिली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या पोलिस विभागाची लक्तरं चांगलीच वेशीवर टांकली आहे. महाराष्ट्र पोलिस सगळ्यात असक्षम असल्याचा थेट आरोपच त्यांनी केला आहे. पोलिस हप्तेखोर कसे आहेत हे त्यांनी ठासून सांगितलं आहे. त्यामुळं आपल्याच सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार लाचखोर पोलिसांचं नेतृत्व कसं करतात, हे गायकवाड यांनी दाखवून दिलं आहे.
प्रमुखांच्या उलट भूमिका
शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची सतत स्तुती करतात. दोन्ही नेते कसे सक्षम आहेत, हे सांगतात शिंदे थकत नाहीत. अशात त्यांच्याच आमदार स्वतःच्याच सरकारला चांगलेच हाणले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापूरसह अनेक संवेदनशील प्रकरणं याच महाराष्ट्र पोलिसांनी हाताळली. शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक प्रकरणं हाताळणारे पोलिस आता अचानक फडणवीस मुख्यमंत्री होताच ‘होपलेस’ ठरले आहेत. त्यामुळं शिंदे यांच्या सांगण्यावरून तर आमदार संजय गायकवाड असं बोलले नसतील ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना हेच महाराष्ट्र पोलिस शिवसेना मंत्री आणि आमदारांना सुरक्षा पुरवायचे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत याच महाराष्ट्र पोलिसांच्या वाय प्लस आणि झेड प्लस सुरक्षेत शिवसेनेचे नेते राज्यभर वावरत होते. याचा पूर्ण विसर आमदार गायवाकड यांना पडल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. शिवसेनेच्या 40 मंत्री, आमदारांना सुरक्षा पुरविणारे महाराष्ट्र पोलिस तेव्हा अकार्यक्षम नव्हते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Akola Shiv Sena : भाजपचा गडी फोडला; थेट उपशहर प्रमुख करून जोडला
सुरक्षेसाठी गुरफट
आजही महाराष्ट्र पोलिस शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना सुरक्षा पुरविण्यासाठी दिवसरात्र एक करतात. व्हीव्हीआयपी दौरा असला की प्रसंगी पोलिस सामान्यांकडे ढुंकूनही पाहात नाही. आपल्या मागंपुढं बंदूक घेऊन फिरायला लावणाऱ्या नेत्यांना आता अचानक पोलिस ‘होपलेस’ कसे वाटू शकतात, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळं राज्य सरकारमधील दोन सत्ताधारी पक्षातील विसंवाद उघड झाला आहे. विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.
आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत लवकरच भाजप एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर शिंदे गायकवाड यांना काय सांगतात अन् गायकवाड शिंदे यांना किती जुमानतात हे बघण्यासारखे ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत असतानाही ‘साहेबांना’ खुश करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. गायकवाड यांनी फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे किडे घालू, असे वादग्रस्त विधान केलं होतं. भाजपच्या नेत्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही गायकवाड यांच्यावर आहे. अशात गायकवाड हे शिंदे यांच्यासाठी ‘नाकापेक्षा मोती जड’ असे तर झालेले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आधीही अडचणीत
आमदार संजय गायकवाड कधीही काहीही बोलून जातात. मात्र आपल्याच वक्तव्यामुळं ते अडचणीत सापडले होते. आपल्या गळ्यातील दात वाघाचा असल्याचं त्यांनी ठोकून दिलं होतं. वाघाची शिकार करून हा दात मिळविल्याचा त्यांचा दावा होता. त्यानंतर वन विभागानं त्यांच्या विरोधात कारवाईचा पंजा कसला. लॅबच्या चाचणीत दात वाघाचा नव्हता प्लास्टिकचा होता, असं निष्पन्न झालं. आता आमदार संजय गायकवाड बुलडाण्यात बसून पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सल्ला देत सुटले आहेत. याच बोलण्याच्या नादात त्यांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे.
आमदार गायकवाडांच्या वक्तव्यानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंद यांचं सरकार देखील अकार्यक्षम असल्याचे चित्र उभं राहिलं आहे. गायकवाड यांच्या या विधानाचा विरोधक निश्चितच राजकीय फायदा घेणार. त्यामुळं आता त्यांना शिंदे कसा ब्रेक लावतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गायकवाड यांचं वक्तव्य भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण करणारं ठरू नये म्हणजे झालं, असं बोललं जात आहे.