
विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या अमरावतीत सन्मान समारंभावरून निर्माण झालेल्या वादात अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असून ते दिशाहीन झाले असल्याची टीका मिटकरी यांनी केली.
अमरावतीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सन्मान समारंभावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राम शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, देश शोकमग्न असताना असा कार्यक्रम घेणे लाजिरवाणे आहे. मात्र याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

अमोल मिटकरी यांनी अतुल लोंढे यांच्या टीकेचा समाचार घेत म्हणाले, काँग्रेसमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे. कोणाला काय बोलायचं ते ठरत नाही. अतुल लोंढे यांना राम शिंदे यांच्याविरुद्ध वक्तव्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. ते पुढे म्हणाले, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला देशाच्या विरोधात आहे. त्यामुळे संपूर्ण देश दु:खात आहे, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, एका प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यामुळे अतुल लोंढे यांनी उगाचच गहजब करण्याचे कारण नाही.
चर्चांना उधाण
मिटकरी यांनी काँग्रेसवर अधिक घणाघाती टीका करताना म्हणाले, काँग्रेसने देशभरात आणि महाराष्ट्रात आपली विश्वासार्हता गमावली आहे. आता त्यांच्याकडे कोणतीही स्पष्ट दिशा नाही. ते फक्त गोंधळ घालण्याचं आणि स्वतःचं अस्तित्व संपवण्याचं काम करत आहेत. अमोल मिटकरींच्या या परखड प्रतिक्रियेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः विधान परिषदेसारख्या सर्वोच्च संस्थेच्या सभापतीचा सन्मान करताना निर्माण झालेल्या वादामुळे, काँग्रेसच्या अंतर्गत समन्वय आणि नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांची ओळख पटवून त्यांना धर्माच्या आधारे लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. त्यामध्ये सिंधू जल करार निलंबित करणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि हवाई व स्थलसीमा बंद करणे यांचा समावेश आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील सरकारला बेकायदेशीर पाकिस्तानी नागरिक आणि स्लीपर सेल्सचा शोध घेण्यासाठी कठोर पावले उचलण्यास केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या काही संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवर चकमकींची शक्यता निर्माण झाली आहे.