महाराष्ट्र

Nitesh Rane : आतंकवाद्यांना पाठीशी घालणारे वडेट्टीवार देशद्रोही

Pahalgam Attack : काँग्रेस नेत्याच्या विधानाने संतापले नितेश राणे

Author

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे. नीतेश राणे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर भाजपचे आक्रमक नेते व कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांची मानसिकता तुष्टीकरणाची आहे. हिंदू धर्माबद्दल द्वेष वाढवणारी असल्याचा आरोप करत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राणे यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य करत, अतिरेकी हल्ल्यादरम्यान लोकांचा धर्म विचारून त्यांना ठार केले गेले, असे म्हणणे कितपत योग्य आहे? अतिरेकी हल्ला करताना लोकांशी संवाद साधतात का? त्यांच्याकडे धर्म विचारायला वेळ असतो का? असे सवाल उपस्थित करत वादळ उठवलं. वडेट्टीवार यांच्या या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत नीतेश राणे यांनी म्हटले, काँग्रेसने पूर्वी भगवा आतंकवादाचा आरोप केला होता. मग आज वडेट्टीवार दहशतवादाला कोणताही रंग नाही असे कसे म्हणू शकतात? यावरूनच त्यांची तुष्टीकरणाची आणि हिंदू द्वेषाची मानसिकता स्पष्ट होते. अशा देशविरोधी विधानांसाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.

Navneet Rana : हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणेसह उपसली तलवार

जखमेवर मीठ

राणे पुढे म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी आतापर्यंत दहशतवादासोबत तडजोडीचे धोरण अवलंबले आहे. आजही वडेट्टीवार यांचे विधान त्याच प्रवृत्तीचे द्योतक आहे. देशासाठी शहीद झालेल्या नागरिकांचा अपमान करणाऱ्यांना माफ करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वडेट्टीवारांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनीच माध्यमांसमोर स्पष्ट सांगितले की, अतिरेक्यांनी धर्म विचारून हत्या केली होती. अशावेळी वडेट्टीवारांनी केलेले विधान म्हणजे मृतांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. घटनास्थळी न जाता असा निष्काळजीपणाचा आरोप करणे हा केवळ मूर्खपणा आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, वडेट्टीवार हे घटनास्थळी उपस्थित नव्हते. तरीही त्यांनी असा निष्कर्ष काढणं म्हणजे जबाबदार नेत्याला शोभणारे नाही.

नीतेश राणे यांनी दापोली येथे दोन गटांमध्ये घडलेल्या वादावरून महायुतीतील शिवसेनेचे नेते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले, योगेश कदम माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी दुसऱ्यांवर जाणारे आरोप स्वतःवर का घेतले, हे समजले नाही. आपले सरकार हिंदुत्ववादी आहे. दंगल घडली तेव्हा कोणांनी विटा-दगड मारले याचा विचार केला पाहिजे. हिंदूंनी एकत्र येऊन ठोस भूमिका घेतली पाहिजे. राणे पुढे म्हणाले, पक्षाच्या चौकटीत अडकून न राहता हिंदू म्हणून एकत्र येणं आणि खांद्याला खांदा लावून लढणं ही काळाची गरज आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणाला आपण यापुढे थारा दिला नाही पाहिजे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!