महाराष्ट्र

Bhandara : मंडोवीच्या वाळूतून उघड झालं तस्करीचं काळं सोनं 

Sand Mafia : पोलीस प्रशासनाच्या सावलीत उघडपणे चालतोय काळाबाजार 

Author

मंडोवी नदीच्या काठावर अवैध रेती उत्खननाने उग्र रूप धारण केले असून तस्कर निर्भयपणे रेती उपसत आहेत. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे हा काळाबाजार दिवसेंदिवस बळावत चालला आहे.

भंडारा जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचे रॅकेट दिवसेंदिवस उघडपणे फोफावत चालले आहे. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा फायदा घेत तस्कर बेधडकपणे रेती उपसत आहे. कायद्याचा धाक शून्य झाल्याचे चित्र आहे. मंडोवी नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेती उत्खननावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन ट्रक आणि एक जेसीबी मशीन जप्त केली आहे.

भंडारा तालुक्यातील मंडोवी नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रकच्या ट्रक भरून रेतीचे उत्खनन सुरू होते. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकत दोन ट्रक व एक जेसीबी मशीन ताब्यात घेतली. मात्र या कारवाईदरम्यान करधा पोलिस स्टेशन आणि स्थानिक महसूल विभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे अवैध उत्खनन त्यांच्या डोळ्यादेखत सुरू होते, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

अवैध धंदा सुरू 

जिल्ह्यातील अनेक भागांतून यापूर्वीही अवैध रेती उत्खननाचे प्रकार उघडकीस आले आहेत, मात्र त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण बसलेले नाही. तस्करांना ना पोलीसांची भीती उरली आहे, ना महसूल यंत्रणेचा अडसर. प्रत्येक वेळी कारवाईनंतर काही दिवसांसाठी हालचाल मंदावते, पण पुन्हा नव्या जोमात हा अवैध धंदा सुरू होतो. या प्रकरणी स्थानिक नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या मते, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांची निष्क्रियता हेच या अवैध धंद्याच्या वाढीमागचे मुख्य कारण आहे. अनेकांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, आमच्या परिसरात दिवसाढवळ्या ट्रक भरून रेती नेताना दिसते, पण प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे.

RTMNU : संविधान शिकण्याची सुवर्णसंधी आता प्रत्येक विद्यार्थ्याला

जप्त करण्यात आलेले ट्रक व जेसीबी मशीन पुढे काय कायदेशीर कारवाईला सामोरे जातील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण या कारवाईमुळे तस्करांचे धाडस कमी होईल का, प्रशासन आता अधिक कठोर पावले उचलेल का, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. जिल्ह्यातील नद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अशा अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाईची गरज आहे. केवळ एकदाच छापे टाकून जबाबदारी पार पडल्याचे भासवणे हा उपाय ठरू शकत नाही. या अवैध रेती तस्करीमागे कोणते ‘बड्या’ हात आहेत? स्थानिक यंत्रणा का गप्प आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!