
वलमाझरी ग्रामपंचायतीने कर भरणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची योजना सुरू केली आहे. या योजनेत लकी ड्रॉद्वारे विमान प्रवासासह विविध बक्षिसं देण्यात येणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी या गटग्रामपंचायतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा एक अभिनव निर्णय घेतला आहे. 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या मासिक ग्रामसभा बैठकीत संपूर्ण कर भरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या लाभार्थ्याला नागपूर-हैदराबाद विमान प्रवास, निवास व परतीचा रेल्वे प्रवास असा शानदार बक्षिसांचा लाभ देण्यात येणार आहे.

योजना 2025 – 26 सालासाठीचे सर्व घरकर व पाणीपट्टीसह मागील सर्व थकबाकी 15 मे 2025 पर्यंत भरल्यास लागू होणार आहे. यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात येईल. त्यातून सहा भाग्यवान लाभार्थ्यांना विविध आकर्षक बक्षिसे दिली जातील. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या चारही गावांमध्ये (खैरी, वलमाझरी, पिटेझरी, आमगाव) कर भरण्याच्या बाबतीत सकारात्मक स्पर्धा सुरू झाली आहे.
निर्णयामागे प्रेरक दृष्टीकोन
वलमाझरी ग्रामपंचायतीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला आहे. तो म्हणजे ग्रामविकासासाठी जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व पर्यावरण रक्षण या क्षेत्रांमध्ये गावकऱ्यांचे योगदान सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सदैव नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतने याआधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय तसेच केंद्र शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवले आहेत.
लकी ड्रॉमध्ये बक्षिसे जिंकणाऱ्या सहा लाभार्थ्यांव्यतिरिक्त प्रत्येक संपूर्ण कर भरणाऱ्या कुटुंबासाठी मोफत कणिक दळण सेवा आणि शुद्ध आरो पाणी पुरवठ्याचा लाभ मिळणार आहे. या छोट्या पण उपयुक्त सुविधा लोकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविणाऱ्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कर भरणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी न राहता एक सामाजिक योगदान ठरत आहे.
बक्षिसांची यादीही आकर्षक
योजनेंतर्गत प्रथम क्रमांकाला नागपूर-हैदराबाद विमान प्रवास व परतीचा वातानुकूलित रेल्वे प्रवास, द्वितीय क्रमांकाला 100 किलो जय श्रीराम तांदूळ, तृतीय क्रमांकाला 5 जणांसाठी नागझिरा सफारी, चौथ्या क्रमांकाला 20 किलो तुरीची डाळ, पाचव्या क्रमांकाला एक टिन खाद्यतेल व सहाव्या क्रमांकाला एक चांदीचा शिक्का असे विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही सर्व बक्षिसे लोकांना आर्थिक व भावनिक दोन्ही स्वरूपात प्रेरणा देणारी आहेत.
ग्रामपंचायतीच्या या अभिनव उपक्रमामुळे गावात कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे. चारही गावांतील नागरिक आता केवळ बक्षिसांसाठी नव्हे, तर गावाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेत आहेत. ग्रामपंचायतीच्या अशा निर्णयांमुळे ग्रामीण भागात विकासाच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. त्यामुळे नागरिकही विकासाचा भाग बनत आहेत.