
कन्हान परिसरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेली रेती तस्करी प्रशासनाच्या डोळ्यादेखत बिनधास्तपणे चालू आहे. कोट्यवधींच्या जब्ती असूनही माफियांचे मनसुबे दिवसेंदिवस अधिकच धाडसी होत चालले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये प्रशासनाने रेती तस्करी रोखण्यासाठी वेळोवेळी कारवाया केल्या असल्या, तरीही कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन दिवसेंदिवस बळावत चालले आहे. चक्क रात्रीच्या अंधारात नदीकाठच्या परिसरात यंत्रसामग्री व ट्रकच्या सहाय्याने खुलेआम उत्खनन केले जात आहे. कायद्याची भीती न ठेवता रेती माफिया बिनधास्तपणे आपले धंदे चालवत आहेत.

गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये कन्हान परिसरात अवैध रेती उत्खननाचे तब्बल 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुमारे 5 लाख 75 हजार 500 रुपये किमतीची रेती जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेती वाहून नेणारे ट्रक व अन्य वाहने मिळून एकूण पाच कोटी 69 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या कारवाईनंतर देखील रेती तस्करांचे मनोबल उंचावलेले दिसत आहे.
निसर्ग हानी
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या साऱ्या तस्करीमागे एक संगठित माफिया रॅकेट कार्यरत आहे. केवळ रेतीच नव्हे तर मुरूम आणि माती यांचे देखील अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी शासनाच्या महसूलाला मोठा फटका बसत आहे आणि निसर्गाचे संतुलनही धोक्यात येत आहे. रात्रीच्या वेळी नदीकाठच्या निर्जन भागात मशीन, ट्रकच्या सहाय्याने हे उत्खनन पार पडते. अनेक वेळा स्थानिक लोकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. या अवैध कृत्यांना पूर्णपणे लगाम घालण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे.
Devendra Fadnavis : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश
अवैध उत्खनन रोखण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नाही, तर या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन यंत्रणा वापरून चौकशी व गस्त वाढवणे अत्यावश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय, महसूल विभाग, पोलीस, वने आणि पर्यावरण विभाग यांच्यात सुसंवाद साधून संयुक्त मोहीम हाती घेतली तरच या अवैध धंद्यावर कायमस्वरूपी आळा बसू शकतो.
एवढ्या मोठ्या कारवायांनंतर देखील जर रेती तस्करी थांबत नसेल, तर हे स्पष्ट होते की कुठेतरी नियंत्रणात मोठी त्रुटी आहे. आता जनतेच्या नजरा जिल्हा प्रशासन व पोलीस यांच्यावर खिळल्या आहेत. भविष्यात हे अवैध उत्खनन रोखण्यासाठी कोणते ठोस पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.