
पूर्वी परंपरेच्या नावाखाली बालविवाह सामान्य मानले जायचे. पण आज हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, परंतु काही मानायला तयार नसतात. तर काहींना बालविवाह थांबवण्याचे महत्त्व कळते. याच जाणिवेचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील एका धाडसी कारवाईतून आला.
पूर्वीच्या काळात मुलींचे वय केवळ दहा-बारा वर्षांचे असताना त्यांचे विवाह लावून दिले जात. शिक्षण, आरोग्य, मानसिक परिपक्वता यांचा विचार न करता केवळ प्रथा, परंपरा आणि समाजाच्या दबावामुळे बालविवाह हे सामान्य मानले जायचे. परंतु काळ बदलतो आहे. समाज प्रगल्भ होतो आहे. आणि आता प्रत्येकाला समजत आहे की बालविवाह म्हणजे केवळ एका निरागस आयुष्यावर अन्याय नाही, तर ती संपूर्ण पिढीच पिढ्यांमागे नेणारी गोष्ट आहे.
आजही दुर्दैवाने काही भागांत बालविवाहाची पद्धत पूर्णपणे संपलेली नाही. मात्र, अशा चुकीच्या प्रथांवर प्रशासन आणि समाज एकत्र येऊन रोकठाम करत आहेत. याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात नुकतेच घडलेली घटना. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गोपालनगर आणि दिग्रस तालुक्यातील डोळंबा या दोन छोट्या गावांमध्ये होणारे दोन बालविवाह प्रशासनाने वेळेत रोखले. महिला व बालविकास विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

समजूत काढली
प्रशासनाच्या पथकाने मुला-मुलीचे पालक, कुटुंबीय आणि संबंधित सर्वांची समजूत घातली. बालविवाहाचे कायदेशीर, शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम समजावून सांगितले. या संवादामुळे पालकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी स्वखुशीने विवाह स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवाहन केले की, विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना बालविवाहासारख्या पिढ्यान्पिढ्या नुकसान करणाऱ्या प्रथा बंद होणं गरजेचं आहे. जर समाजातील प्रत्येकाने लक्ष ठेवलं आणि मदतीसाठी पुढे आलं, तर आपण एक मुलगी नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य उजळू शकतो. तिचं शिक्षण, तिचं स्वप्न आणि तिचं स्वातंत्र्य हेच तिचं खरं आयुष्य आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. शाळा, कॉलेजचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच गावातील मौलवी, पंडित किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा घटनांबाबत तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. समाजाने जर एकत्र पाऊल टाकलं, तर अशा चुकीच्या प्रथा सहज थांबवता येतील. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, कायदा आणि समाज एकत्र आले, तर कोणतीही लढाई जिंकता येते, हे यवतमाळच्या या घटनेवरून स्पष्ट होते. आजही अनेक ठिकाणी बालविवाह हे गुपचूपपणे होतात. पण जर प्रत्येक नागरिक सजग राहिला आणि एका मुलीचं बालपण वाचवलं, तर तो खरा सामाजिक बदल ठरेल.