
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवादाला धडा शिकवला. भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कौतुक करण्यात आले आहे.
22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला झाला. पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानुष हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांनी प्राण गमावले. देशभरात संतापाची लाट उसळली आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात केवळ एकच प्रश्न घोळत राहिला पाकिस्तानला कधी देणार उत्तर? भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादाच्या मूळ स्रोतांवर थेट प्रहार करत एक निर्णायक कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर या नावाने एअर स्ट्राईकमध्ये भारताने पाकिस्तानातील 9 प्रमुख दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधत त्यांना खाक केले.
सरकारच्या या कारवाईने पाकिस्तानातील दहशतवादी तळांची धूळधाण झाली आहे. या मोहिमेमुळे भारताने केवळ हल्ल्याचा बदला घेतला नाही, तर दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला तुम्ही आमच्या बहिणींचं सिंदूर हिरावलं, आम्ही त्यांचा सन्मान परत मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आणि गोंदियाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या कारवाईसाठी भारतीय सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे. भारतीय सैन्याला सलाम आणि शाब्बास मोदी जी, जय हिंद, असं ठणकावून सांगताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावामागील भावनिक अर्थही स्पष्ट केला.

Operation Sindoor : मोदी सरकारच्या निर्णयाला अकोल्यात भाजपचा पाठिंबा
सैन्याची ताकद
पहलगामच्या हल्ल्यात अनेक बहिणींचं सिंदूर मिटलं. त्या वेदनेला आम्ही विसरू शकत नाही. पण आता भारतीय सैन्याने त्या बहिणींचा सन्मान परत मिळवला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. पटेल म्हणाले, हे केवळ बदला नव्हे, तर भारताची ताकद आणि निर्धार आहे. बालाकोट नंतरही पाकिस्तान शहाणा झाला नाही. आता ऑपरेशन सिंदूरने त्यांना दाखवून दिलं की भारत यापुढे अधिक निर्णायक कारवाई करू शकतो. यावेळी आम्ही फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे. निष्पाप नागरिकांनाही आम्ही दुखावलेलं नाही. पटेल पुढे म्हणाले, “आता आंतरराष्ट्रीय समुदायानेही जागं व्हायला हवं.
पाकिस्तानच्या भूमीतून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी जागतिक दबाव आणला पाहिजे. भारताने संयमाचे उत्तर ठाम कृतीने दिलं आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचं कार्य हे आमच्या सशस्त्र दलांनी अत्यंत समर्थपणे पार पाडलं आहे. त्यांनी याचबरोबर देशांतर्गत राजकीय विरोधकांनाही टोला लगावत म्हटलं, जे लोक सैन्याच्या क्षमतेवर, संरक्षणखात्यातील निर्णयांवर शंका घेत होते, त्यांनी आता कायमचं गप्प बसावं.