महाराष्ट्र

Nagpur : विद्यार्थिनींचे मागवले अर्धनग्न फोटो

Maharashtra : शैक्षणिक कामाच्या नावाखाली पालकांची फसवणूक

Share:

Author

नागपूरमध्ये शिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींच्या अर्धनग्न फोटोची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या नावाचा वापर करून पालकांना बनावट मेसेज पाठवण्यात आला.

‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या व्यवस्थेच्या मुखवट्याआड लपलेली एक भीषण सत्यकथा नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. महाल परिसरातील एका नामांकित शाळेच्या नावाचा वापर करून आठवी आणि नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अर्धनग्न फोटोची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शैक्षणिक कामाच्या नावाखाली चालवलेला हा सायबर भोंगळपणा फक्त एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या असुरक्षिततेचं भान देणारा आहे.

या प्रकरणात आरोपींनी पालकांना ‘शाळेचे अधिकारी’ असल्याचा बनाव करून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधला. सुरुवातीला पासपोर्ट साइज फोटो मागवले गेले, जे पालकांनी कोणतीही खातरजमा न करता पाठवले. मात्र, यानंतर जे घडलं, त्याने पालकांच्या पायाखालची जमीनच सरकवली. त्याच क्रमांकावरून विद्यार्थिनींचे अर्धनग्न फोटो मागवण्यात आले. शासकीय योजनांसाठी आवश्यक आहे, असं कारण देण्यात आलं.

संदेशच नाही

घटनेनं समाजमन हादरून गेलं आहे. एकाच शाळेतील सुमारे 15 ते 16 विद्यार्थिनींच्या पालकांना अशा प्रकारचे मेसेजेस आले. आपली मुलगी सुरक्षित आहे का, हा मूलभूत प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा पालकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. जेव्हा पालकांनी शाळेशी संपर्क साधला, तेव्हा खळबळजनक सत्य उघड झालं. शाळेकडून असा कोणताही आदेश किंवा संदेश पाठवण्यात आलेला नव्हता. हे स्पष्ट होताच पालकांनी वेळीच सावध होऊन संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Chandrashekhar Bawankule : भारताची शांती खोटी नाही, वादळाची तयारी आहे 

पोलिसांनी तातडीने अज्ञात आरोपीविरोधात सायबर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, सखोल तपास सुरु आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींच्या अर्धनग्न फोटोची मागणी करण्यात आली. शाळेच्या नावाचा गैरवापर करून 15-16 पालकांना बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवले गेले. शाळेने यावर स्पष्ट खंडन दिलं असून, पोलिसांनी सायबर गुन्ह्याची नोंद करत तपास सुरू केला आहे.

सावधगिरी बाळगावी

या घटनेवरुन एक बाब स्पष्ट होते की, महिलांची, विशेषतः अल्पवयीन मुलींची सुरक्षितता अजूनही रामभरोसे आहे. शासन आणि शिक्षण संस्था यांच्यातील संवादात दरी आहे. त्याचा गैरफायदा घेत समाजातील विकृती मोकाट सुटत आहे. आज जे एका शाळेत घडलं, ते उद्या आपल्या घरापर्यंत येऊ शकतं. फक्त सावधगिरीने नव्हे, तर व्यवस्थेच्या सजगतेनेच अशा प्रकारांना आळा घालता येईल.

या घटनेला गंभीरतेने लक्षात घेता पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कोणताही फोटो, विशेषतः मुलींचा, अनोळखी क्रमांकावर पाठवण्याआधी खात्री करावी. संशयास्पद मेसेज आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. हातात स्मार्टफोन आले पण डोळ्यात संवेदनशीलता हरवली. शिक्षण हक्काचा नाही, सुरक्षिततेचा प्रश्न झाला आहे. या घटनेनं समाजाला एक प्रश्न विचारायला भाग पाडलं आहे. आपण खरंच ‘नारीशक्ती’चं रक्षण करतो आहोत, की फक्त घोषणांमध्ये गुंतून पडलो आहोत?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!