
भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्ववभूमीवर भाजप नेते विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात वातावरण तापले असतानाच, भाजप नेत्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला लढा आणि त्यानंतर भारताने राबवलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. भारताने पाकिस्तानला दिलेलं हे प्रत्युत्तर सैन्याच्या शौर्याची साक्ष देणारे ठरले, आणि यात महिलांच्या सहभागानेही देशभरात अभिमानाची भावना निर्माण झाली. मात्र मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी केलेल्या विधानाने राजकारणात नव्या चर्चेला उधाण मिळाले आहे.
एका जाहीर कार्यक्रमात शहा यांनी भारतीय सैन्यातील महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेले विधान वादग्रस्त ठरले. शाह म्हणाले की, ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्या समाजातील बहिणीला पाठवलं. इतकंच नव्हे, तर त्यांनी अप्रत्यक्षपणे कर्नल कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण असे संबोधले. विजय शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला आहे. शाह यांनी केवळ कर्नल सोफिया कुरेशीचाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सेनेचा अपमान केला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Local Body Elections : विदर्भात भाजपच्या शिलेदारांची फौज सज्ज
एकात्मतेवर मोठा आघात
महिलांबद्दल आणि अल्पसंख्याकांबद्दल असलेली ही विकृत मानसिकता अत्यंत लाजीरवाणी आहे. देशासाठी लढणाऱ्या एका बहाद्दर महिला अधिकाऱ्याविषयी अशी भाषा वापरणे हे निषेधार्हच नाही, तर देशद्रोहाच्या जवळ जाणारे आहे, असे पटोले म्हणाले. पटोले यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला, जर खरंच भाजपला देश, संविधान आणि सैन्याबद्दल प्रेम असेल, तर त्यांनी तत्काळ विजय शाह यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सध्या देशभरातून या वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे. भाजप आणि मध्य प्रदेश सरकार विजय शाह यांच्यावर कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विशेषतः जेव्हा भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला अधिकाऱ्यांनी धाडसाने पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या कारवायांचा पर्दाफाश केला, तेव्हा त्यांची शौर्यगाथा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. कर्नल कुरेशी यांनी केलेले योगदान देशासाठी अत्यंत मोलाचे असून त्यांच्याबद्दल अपमानजनक विधान करणे केवळ असंवेदनशीलतेचेच नव्हे, तर अशा वक्तव्यामुळे देशाच्या एकात्मतेवरही आघात होतो.