
अकोल्यातील शिंदे सेनेच्या नेत्याचा पद्धतशीर काटा काढण्यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावण्यात आली आहे. यासाठी मुंबईमध्ये अनेकांनी आवाज बुलंद केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी फारकात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेत. शिंदे यांच्या पाठोपाठ ठाकरेंचे अनेक शिलेदार ‘मशाल’ खाली टाकून धनुष्यबाण हाती घेऊन त्यांच्यासोबत महायुतीमध्ये सत्तारूढ झाले. त्यामुळे राज्यभर सर्वत्र भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती सत्तेवर आली. सध्याच्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महायुती अधिक घट्ट झाल्याचे बोलले जात आहे. परंतु अकोल्यामध्ये महायुतीच्या मैत्रीपूर्ण मधुर संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी काही नेते सक्रिय झाले आहेत. महायुती मधील एका मित्रपक्षाने अकोल्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीसेठ अर्थात माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची फिल्डिंग लावण्यासाठी भूसुरंग पेरले आहेत.
माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना विरोध करण्यासाठी मुंबईमध्ये आवाज बुलंद करा, अशी सुपारी शिवसेनेच्या मित्रपक्षातील काही नेत्यांनी अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे अलीकडेच मुंबईत झालेल्या एका बैठकीमध्ये ‘गोपीकिशन बाजोरिया हटाव’चा नारा देण्यात आला आहे. गोपीकिशन बाजोरिया आमदार म्हणून किती असक्षम होते, हे पटवून देण्याचा प्रयत्नही एकनाथ शिंदे यांच्या समोर करण्यात आला. याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीकिशन बाजोरिया यांचा कितपत उपयोग झाला? याची देखील गोळाबेरीज एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आली. हे सगळं शिंदेंना पटवून देत गोपीकिशन बाजोरिया यांची ‘विकेट’ घेण्याचा प्रयत्न शिवसेनेतील काही नेत्यांनी चालवला आहे. मात्र ही ‘विकेट’ घेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावणारा खरा ‘बुकी’ शिवसेनेच्या एका मित्र पक्षामध्ये बसलेला आहेत.

‘स्थानिक’चा धसका
गोपीकिशन बाजोरिया हे आमदार गोवर्धन शर्मा यांच्यानंतर अकोल्यातील दुसरे मोठे हिंदी भाषिक नेते आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या मित्र पक्षाला हिंदी भाषकांची मतं अकोल्यामध्ये विभाजित होऊ शकतात व शिवसेनेचे प्राबल्य वाढू शकते, अशी भीती वाटू लागली आहे. हिंदी भाषिक आणि त्यातही व्यापारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोपीकिशन बाजोरिया यांची विकेट घेतली तर आपला रस्ता ‘क्लियर’ होईल हे मित्र पक्षातील संबंधित नेत्याला लक्षात आले आहे. त्यामुळेच त्याने गोपीकिशन बाजोरिया यांना दुधातील माशी प्रमाणे बाहेर काढण्यासाठी मोठी ‘फिल्डिंग’ रचली आहे. यासाठी शिवसेनेमध्येच पेरून ठेवलेल्या काही नेत्यांचा वापर मित्र पक्षातील संबंधित नेते करीत आहेत.
आता शिवसेनेमध्ये जे गृहयुद्ध मित्रपक्षाने लावून दिले आहे, त्यावर विश्वास ठेवत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्र पक्षाकडूनच शिवसेनेच्या पाठीमध्ये ‘बाण’ मारल्या जात असतील तर एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा जसे काही निवडणुकीमध्ये पानीपत झाले, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती मातीमोल होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असे स्पष्टपणे बोलले जात आहे.