
संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळी मारली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित अनेक खळबळजनक दावे केल्याचं बोललं जात आहे. विशेषतः या दाव्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींना वाचवले होते, असं म्हटलं असल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पुस्तक प्रकाशनाच्या आदल्या दिवशीच या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली तीही नेहमीच्या ठसक्यात आणि कोपरखळीयुक्त शैलीत.
‘कथा, कादंबऱ्या आणि बाल बालवाङ्मय वाचण्याचं वय माझं राहिलेलं नाही,’ असं सूचक विधान करत फडणवीस यांनी या संपूर्ण पुस्तकालाच ‘बालसुलभ लेखन’ म्हणत टोला लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय राऊत यांना दुय्यम महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? अशा थेट शब्दांत त्यांनी राऊत यांचा उल्लेख केला. तसेच, वादग्रस्त मजकूर असलेली पुस्तके वाचण्याची गरजच नाही, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. पुस्तकातील दावे खरंच राजकीय भूकंप घडवणारे ठरतात का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.या पुस्तकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. या पुस्तकाचं नाव ‘नरकातला राऊत’ असावं.

Narendra Bhondekar : मतदार यादीतून नाव वगळल्याने अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
मातोश्रीवरील गूढ भेट
बावनकुळे यांनी यासाठी राऊतांना पत्रही पाठवणार आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. बावनकुळे म्हणाले की, या पुस्तकात संजय राऊत यांनी खरंतर स्वतःच्या राजकीय अधिपत्याच्या हव्यासाची, नैतिक दिवाळखोरीची कहाणी लिहिली आहे. त्यांनी शिवसेना संपवली, हिंदुत्व विचारांचा त्याग केला आणि काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याचं पाप केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली भाजपा-शिवसेना युती सर्वोत्तम होती आणि त्या युतीला न्याय देण्याचं कामही त्यांनी केलं होतं, असं सांगत राऊत आणि ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी डबल फटके लगावले आहे. राऊत यांच्या मते, नरेंद्र मोदी यांना एका विशिष्ट काळात वाचवण्यासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी हस्तक्षेप केला होता.
इतकंच नव्हे तर पुस्तकात ‘राजा का संदेश साफ है’ नावाचं एक संपूर्ण प्रकरणही आहे, ज्यात अमित शहा यांचा उल्लेख आहे. गुजरात दंगलीनंतर शहा यांच्यावर सीबीआयचा ससेमिरा लागला होता आणि त्यांना तडीपार देखील करण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत ते मातोश्रीवर आले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एका फोनवर त्यांना संकटातून बाहेर काढलं, असा गंभीर दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. खुद्द संजय राऊत यांनी म्हटले आहे की, या पुस्तकामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल. त्यामुळे आता हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता सर्वत्र आहे.राजकारणात अनेक गोष्टी पडद्यामागे राहतात. पण संजय राऊत यांनी त्यातील काही गोष्टींचा पडदा उघडण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांच्या पुस्तकाच्या प्रचारातून दिसतंय.
मोदी-शहा यांच्यावर जे आरोप केले गेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी, पुस्तकप्रेमी आणि राजकीय वर्तुळ दोघेही या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘नरकातला स्वर्ग’ नेमका कोणत्या स्वर्गीय गोष्टी उलगडतो, हे येत्या काही वेळातच स्पष्ट होईल.