प्रशासन

Amravati : गांजाची ग्रीन डील फसली पोलिसांच्या सापळ्यात

Police Raid : क्राईम ब्रांचने उधळला अंमली पदार्थाचा खेळ

Author

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधीत आरोपींविरुद्ध क्राईम ब्रांचने जोरदार कारवाई सुरू केली आहे.

अमरावती शहरात वाढत असलेल्या मादक पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी आता आक्रमक मोर्चा उघडला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच एक मोठी कारवाई करत गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई अमरावती शहराच्या नांदगाव पेठ टोल प्लाझा परिसरात करण्यात आली आहे. यामध्ये दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 8 किलो 165 ग्रॅम गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 5 हजार 375 रुपये इतकी आहे.

पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून संपूर्ण शहरात मादक पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई अत्यंत मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच नांदगाव पेठ टोल प्लाझाजवळ पार पडली. क्राईम ब्रँचचे पथक पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली सतत गस्त घालत होते. याच दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे, टोल प्लाझाजवळील राठी फार्महाऊस परिसरात सापळा रचण्यात आला होता. गस्तीदरम्यान, दोन संशयितांना थांबवून त्यांची कसून झडती घेण्यात आली होती.

Anil Deshmukh : ‘ऑरेंज बेल्ट’ला नळगंगा वैनगंगा प्रकल्पात जागा नाही

यशस्वी कारवाईचे परिणाम

त्यांच्याकडून गांजाची मोठी खेप मिळून आली. आरोपींची नावं अब्दुल शकील अब्दुल रफीक आणि सुलतान बेग जमील बेग अशी असून, त्यांना ताबडतोब अटक करण्यात आली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 2 लाख 3 हजार 375 रुपयांचा गांजा, तसेच 2 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 5 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून दोन्ही आरोपींविरुद्ध अधिक तपास सुरू आहे.

तपासात अजून कुणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अमरावती शहरात मादक पदार्थांचे जाळे उलगडण्याच्या दिशेने ही कारवाई एक मोठे पाऊल ठरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दल गांजा, ब्राउन शुगर, मेफेड्रॉन (MD), आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करीवर लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर अशा यशस्वी कारवायांनी पोलिसांची प्रतिमा बळकट होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी हे गांजा शहरात आणून स्थानिक तरुणांना विकण्याच्या तयारीत होते. टोल नाक्याजवळ अडवल्यामुळे मोठा गुन्हा टळला आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर टोळ्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Indian Army : ऑपरेशन सिंदूरची व्याख्या आता जगाच्या कानांवर 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!