
विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देशभरात टीकेची झोड उठली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तापलेले आहे. नुकत्याच भारताने पाकिस्तानवर राबवलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य आणि विशेषतः या लढ्यात महिलांच्या सहभागाने सर्वांमध्ये अभिमानाची लहर निर्माण झाली आहे. मात्र, मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात विजय शाह यांनी भारतीय सैन्यातील महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वादळ उठले आहे.
विजय शाह यांनी कर्नल सोफिया यांना दहशतवाद्यांची बहीण अशी अप्रत्यक्षपणे संबोधले. तसेच या वक्तव्यात त्यांनी या महिलेला पाठवण्यामागील कारण स्पष्ट करताना ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या त्यांना धडा शिकवण्यासाठी असा उल्लेख केला. या विधानावरून काँग्रेसकडून तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, विजय शाह यांच्या वक्तव्याला 48 तासांपेक्षा जास्त काळ झाला असूनही, भाजप किंवा मध्यप्रदेश सरकारने अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. भारतीय सशस्त्र दल हे आपल्या देशासाठी अत्यंत आदरणीय आहेत.

सैन्याचा अपमान
अशा वक्तव्यांनी त्यांचा अपमान झाल्याचे आम्ही मानतो, असेही त्यांनी सांगितले. विजय शाह आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांच्या विधानाला देशाच्या सैन्याचा अपमान म्हणून पाहण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.या वादग्रस्त विधानावर अखेर कारवाईही झाली आहे. जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, इंदुरमधील मानपूर पोलीस ठाण्यात विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपच्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात तणाव निर्माण झाला आहे.
यावरून मोठा राजकीय वाद उभा राहिला आहे.काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही भाजपवर कडाक्याच्या शब्दांत टीका केली आहे. विजय शाह यांनी फक्त कर्नल सोफिया कुरेशी यांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय सैन्याचा अपमान केला आहे, असा आरोप पटोले यांनी केला. भाजपच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी या वादग्रस्त वक्तव्या निंदनीय असल्याचे स्पष्ट केले.
Anil Deshmukh : ‘ऑरेंज बेल्ट’ला नळगंगा वैनगंगा प्रकल्पात जागा नाही