
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुलढाण्यात भाजपच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षसंघटनेच्या बळाला दिशा देण्याचे काम फडणवीसांनी केले आहे.
जनसंघाच्या काळात जिथे जागा मिळेल तिथे पक्ष कार्यालयं चालवली. आता बुलढाण्यात आपलं हक्काचं घर उभं करतोय हे बदलाचं वळण आहे असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. १६ मे रोजी बुलढाणा दौऱ्यावर होते. मलकापूर राज्य मार्गावरील नवीन भाजप कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. राज्यभर भाजपने अनुभवलेली वाढ, त्यामागील संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांच्या त्यागाची आठवण करून देत फडणवीस म्हणाले, एकेकाळी कुठल्याही परिस्थितीत पक्ष चालवणाऱ्या कार्यकर्त्यांनीच आजच्या यशात मोलाचं योगदान दिलं आहे.
महाराष्ट्रात दीड कोटी डिजिटली वेरिफाईड सदस्य असलेल्या भाजपचा पाया बुलढाण्यासारख्या जिल्ह्यात घट्ट रुजलेला आहे. हे नव्हे तर येथील प्रत्येक कार्यकर्ता हे नव्या कार्यालयाचे खरे मालक आहेत. भाजपचं कार्यालय हे केवळ इमारत नसून कार्यकर्त्यांचं घर आहे, असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाच्या आगामी धोरणांचीही झलक दिली. महाराष्ट्रात एकही जिल्हा असू नये जिथं पक्षाचं स्वतःचं कार्यालय नसेल, हा आमचा संकल्प आहे. हे कार्यालय फक्त कार्यकत्यांचे अड्डे नव्हे, तर सामान्य जनतेला आपलेसे वाटणारे केंद्र असायला हवे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Akola Shiv Sena : निवडणुकीच्या रणभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण सज्ज
लोकाभिमुखतेचा मूलमंत्र जपा
सोहळ्यात केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, सचिन देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विरोधकांवर टीकेची झोड न उडवता, त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावली. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून संघटनात्मक बळ कसं वाढवायचं, आणि कार्यकर्त्यांना कसं प्रेरित करायचं, यावर त्यांचा भर होता. या कार्यालयातून काम करताना लोकाभिमुखता आणि सेवा यांना प्राधान्य मिळावं, हीच आपली अपेक्षा आहे, असं सांगून त्यांनी उपस्थित आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रामाणिक सेवा व संघटनशक्तीच्या बळावर पुढे जाण्याचे आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीत मिळालेलं प्रचंड यश हे संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आहे, असं सांगून फडणवीस म्हणाले की, सिंचन प्रकल्प, रस्त्यांचं जाळं, नवउद्योगांची संधी आणि तरुणांच्या हाताला काम देणं हे सरकार वेगाने करत आहे. ते पुढे म्हणाले, लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकाभिमुखतेचा मूलमंत्र विसरू नये. जनतेशी संपर्क टिकवून ठेवणं, त्यांचं म्हणणं ऐकणं आणि त्यांच्यासाठी कार्य करणं हेच खरे यशाचे रहस्य आहे. बुलढाण्यातील भाजप कार्यालयाचं भूमिपूजन हे केवळ एका इमारतीचं उद्घाटन नव्हे, तर संघटनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. पक्षाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे कार्यालय नव्या प्रेरणेने भरून टाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त झाला.