
कचर्याच्या डोंगरातून हरित क्रांतीची वाट साकारतेय नागपूरची भांडेवाडी. देशातील पहिल्या एकीकृत घनकचरा प्रकल्पाने स्वच्छतेच्या दिशेने इतिहास घडवायला सुरुवात केली आहे.
देशातील पहिले आणि अनोखे एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकार होतोय नागपूरमध्ये. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मे शनिवारी सायंकाळी भांडेवाडी डम्पिंग यार्डला भेट दिली. या वेळी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या (मनपा) अधिकाऱ्यांशी संवाद साधून, सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि हा प्रकल्प येत्या नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या भेटीत मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्त चौधरी यांनी उपमुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये प्रति दिवस एक हजार टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला एक अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी मनपा आणि नेदरलँडमधील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SUSBEDI) या कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. कंपनी 30 एकर जागेवर स्वतःच्या खर्चाने हा प्रकल्प उभारत आहे.

पर्यावरणाचे संरक्षण
या प्रकल्पांतर्गत कचऱ्याचे शास्त्रशुद्ध प्रकारे प्रसंस्करण करून बायोगॅस, जैविक खत आणि RDF (Refuse Derived Fuel) अशा उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. या उत्पादनांची विक्री करण्याचा अधिकार मेसर्स सुसबडी या कंपनीकडे असेल. याशिवाय, नऊ एकर भूखंडावर नव्या म्हणजेच फ्रेश वेस्ट प्रोसेसिंग युनिट उभारले जाणार असून त्यासाठी जागा दिली गेली आहे. हे युनिट शहरातील रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्वरित प्रक्रिया करेल. ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि नागपूरच्या स्वच्छतेत अधिक भर पडेल.
Nagpur : बावनकुळे यांचा बुलडोजर सुरू, अतिक्रमण साफ, नाले मोकळे
स्पष्ट आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुरू असलेल्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत म्हणून घोषित केली. या प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हा भारतामध्ये असा पहिलाच एकीकृत आणि शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. जो स्थानिक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीतून उभा राहत आहे. यामुळे नागपूर शहर देशात एक नवा आदर्श निर्माण करणार आहे. कचरामुक्त आणि हरित शहराच्या दिशेने हा एक मोठा टप्पा असेल.