
नागपूरच्या गोरेवाडा परिसरात निसर्गसंवर्धन, शिक्षण आणि अध्यात्म यांचा संगम साधणारा जैवविविधता पार्क साकारला जाणार आहे. समाजात पर्यावरणप्रेमाची बीजे रुजवणारा हा प्रकल्प हरित भविष्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल.
नागपूरच्या हिरवळीत लवकरच एक असा जैवविविधता पार्क आकार घेणार आहे, जो केवळ पर्यावरण रक्षणाचाच नव्हे, तर शिक्षण, अध्यात्म आणि आधुनिक विज्ञानाचाही संगम ठरेल. निसर्गसंवर्धनाची जीवनदृष्टी रुजवण्यासाठी आणि समाजाच्या प्रत्येक घटकात पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण होणार. गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्क हे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
रामगिरी येथील मुख्यमंत्री निवासस्थानी या पार्कसंदर्भातील प्राथमिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त बी. वैष्णवी, ‘ग्रीन यात्रा’चे प्रमुख प्रदीप त्रिपाठी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या जैवविविधता पार्कसाठी काही निधी शासनाकडून तर काही निधी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (CSR) अंतर्गत उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हिरवे विश्व
सुमारे तीन लाख चौरस मीटर क्षेत्रात उभारला जाणारा हा पार्क निसर्गाशी संवाद साधणारा, शिक्षण देणारा आणि आत्मअनुभव घडवणारा ठरेल. ‘शिकणे, अनुभवणे आणि जपणे’ या तीन प्रमुख तत्त्वांवर आधारित हा प्रकल्प उभा राहील. कृषी, विज्ञान, वनशास्त्र आणि जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रयोगशील केंद्र असेल. पारंपरिक वनस्पतींसह स्थानिक जैवसंपदेला येथे जागा दिली जाईल. विशेष म्हणजे 150 हून अधिक प्रकारच्या बांबू प्रजातींचे येथे संशोधन व संवर्धन केले जाणार आहे.
बायो-पार्कमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत निसर्गसंवर्धनाच्या विविध कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या जातील. यात देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन केंद्र, फुलपाखरांचे आणि काजव्यांचे विशेष वन, मातीचे विविध प्रकार मांडणारे गॅलरी, पर्जन्यमापन केंद्र, दिशाशास्त्र अनुभूती, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्रीय आणि आरोग्यविषयक झोन अशा अनेक घटकांचा समावेश असेल.
Nagpur : मुख्यमंत्र्यांचा स्वच्छतेचा मंत्र; भोंडेवाडीतून हरीत क्रांतीची चाहूल
प्रत्येकाने निसर्गाशी नाते जोडावे, त्याची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जैवविविधतेचे समृद्ध भांडार जपावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नागपूरचा हा बायो-डायव्हर्सिटी पार्क पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरेल आणि संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणास्थान बनेल, यात शंका नाही.