महाराष्ट्र

Nagpur Police : ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून आयुक्तांचा आक्रमक अवतार 

Ravinder Singal : नागपुरमध्ये गुन्हेगारीला जोरदार हादरा 

Author

नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत शहरातील अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाईचा धडका दिला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली अनेक आरोपींना अटक करत तब्बल कोट्यवधींचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला.

नागपूर शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि अवैध धंद्यांना कायमचा आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने ‘ऑपरेशन थंडर’ या विशेष मोहिमेची धगदार सुरुवात केली आहे. मागील एका महिन्याच्या कालावधीत नागपूर पोलिसांनी या अभियानांतर्गत अवैध नशेच्या धंद्यावर जबरदस्त कारवाई करत संपूर्ण शहरात 28 ठिकाणी धाड टाकली. या कारवायांमध्ये सुमारे 1 कोटी 31 लाख 56 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. 47 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

मोहिमेचे नेतृत्व पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल स्वतः करत आहे. त्यांनी मैदानात उतरत कारवाईचे रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या थेट सहभागामुळे पोलिस दलात नवा उत्साह संचारला असून, गुन्हेगारीला तोंडघशी पाडण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरत आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत, पोलिसांनी मागील 30 दिवसांत एमडी ड्रग्जचा एक किलो 400 ग्रॅम साठा, 17 किलो गांजा, तसेच अफू जप्त केली. एवढेच नव्हे तर अनेक बेकायदेशीर धंदे, गुटखा विक्रेते, विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Supreme Court : वक्फच्या धगीवर न्यायालयीन तपासणीचा करडा प्रकाश 

कठोर भूमिका

19 मे रोजी पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी जरीपटका आणि यशोधरा नगर परिसरात अचानक भेट देत पेट्रोलिंग केले. दरम्यान, खोब्रागडे चौकातील एका पानठेल्यावर बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी राजश्री, विमल, रजनीगंधा, बाबा, केपी ब्लॅक लेबल अशा ब्रँड्सचा गुटखा जप्त केला. यानंतर त्यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण शिरसागर यांना तातडीने फटकारले आणि अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. फक्त गुटखा विक्रेत्यांवरच नाही, तर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहनचालक, वाईन शॉपजवळील अंडे विक्रेते, प्लास्टिक ग्लास विक्रेते अशांवरही पोलिसांनी कारवाई केली.

त्याच दिवशी त्यांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात अचानक भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी भिलगाव परिसरात घडलेल्या खुनाच्या प्रकरणात संशयितांची चौकशी त्वरित करण्याचे आदेश दिले. यासोबतच दारू गुत्ते, गुटखा विक्रेते, हुज्जतबाजी करणारे, झिंगणारे व्यक्ती आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सिंगल यांनी आपल्या कृतीतून स्पष्ट संदेश दिला. जर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करू शकतो, तर स्थानिक अधिकारी का नाही?

Nagpur : उपराजधानी बनली ड्रग्जची ट्रान्झिट पॉईंट

सिंगल यांचा हा ठाम आणि थेट पवित्रा पोलिस यंत्रणेत कामचुकारपणाला जबर धक्का देणारा आहे. ही कार्यशैली केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे, तर नागपूर पोलिस दलाचे जनतेतील विश्वासार्हतेचे स्थान पुनर्स्थापित करण्याची दिशाही ठरते आहे. ऑपरेशन थंडर ही मोहीम नागपूर शहरात एक सकारात्मक बदल घडवून आणत आहे. गुन्हेगारीला मूठभर घटकांपुरती मर्यादित ठेवण्यासाठी पोलिसांची ही आक्रमक पावले निर्णायक ठरत आहेत. यामुळे नागपूरकरांना आता अधिक सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अधिक विश्वास वाटू लागला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!