राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झाले आहेत.
समाजात आजही महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जातो, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी वैष्णवी हगवणे सारख्या तरुणीचे हुंड्याच्या छळामुळे झालेले दुःखद निधन हे समाजाच्या दांभिकतेचे प्रतीक आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी घडलेली ही घटना राज्यभरातील जनतेला हादरवून गेली आहे.
तेवीस वर्षांची वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. तिच्या आत्महत्येचं कारण म्हणजे हुंड्यासाठीचा मानसिक आणि शारीरिक छळ. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, लग्नात भरघोस हुंडा दिल्यानंतरही सतत पैशांची मागणी केली जात होती. शेवटी, सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडल्यावर तिने आपलं जीवन संपवलं.
कुटुंबाचा गंभीर आरोप
वैष्णवीच्या सासरच्यांकडून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोनं, एक फॉर्च्यूनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. मात्र, त्यानंतरही वैष्णवीवर अधिक पैशांची मागणी करण्याचा दबाव वाढत गेला. या त्रासामुळे तिला घराबाहेर काढण्यात आले होते. वैष्णवीचे सासरे आणि दीर हे दोघंही सध्या फरार आहेत.
घडलेल्या घटनेने केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना, राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे सांगितले. शासन बघ्याची भूमिका घेत असेल तर ही बाब लाजीरवाणी असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. याशिवाय, कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आरोपींवर त्वरित कारवाई आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
IPS Transfer : सीएमच्या गावात डंका गाजविणारे चांडक सांभाळणार अकोला
न्यायासाठी आवाज वाढतोय
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक हगवणे याला राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे की, आरोपींना कुणीही पाठीशी घालणार नाही. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नसतानाही, पक्षाने स्वतःहून दखल घेतली आहे. पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वैष्णवीचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. महिलांवरील अत्याचार, विशेषतः हुंड्यासाठी होणारा छळ, हा अजूनही आपल्या समाजात जिवंत आहे, ही खंत व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि नागरिक या घटनेच्या निष्पक्ष तपासाची आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
वैष्णवीच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा समाजातील स्त्रीविरोधी मानसिकतेचं भीषण वास्तव समोर आलं आहे. हुंड्याच्या कुप्रथेने अजून एका तरुणीचे आयुष्य हिरावून घेतले. आता वेळ आली आहे की समाजाने एकत्र येऊन अशा प्रथांचा पूर्णपणे बंदोबस्त करावा. सरकारने देखील कठोर कायदे प्रभावीपणे लागू करून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.
