पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या पाकसाठी झालेल्या हेरगिरी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर भूमिका घेत तपासासाठी विशेष पावले उचलण्यावर भर दिला.
वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू हे एक आत्महत्या प्रकरण नसून त्यामागे आणखी काही गूढ असावे, अशी शक्यता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. “वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचा तपास दोन्ही अंगाने केला जात आहे. तिच्या अंगावर आढळलेल्या वळांमुळे आणि तिच्या कुटुंबीयांकडे असलेल्या एका महत्त्वाच्या ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकरणातील एक अत्यंत भावनिक आणि संवेदनशील बाब म्हणजे वैष्णवीच्या बाळाची अवस्था. तिच्या मृत्यूनंतर बाळ कुठे आहे याचा शोध तिचे नातेवाईक घेत होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांच्या पुढाकाराने हे बाळ नीलेश चव्हाणकडून हस्तगत करण्यात आले. फडणवीस म्हणाले, “आता हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे म्हणजेच कसपटे कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आले असून हे कुटुंब त्या बाळासाठी योग्य आहे.
हेरगिरीचे धक्कादायक वास्तव
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले, ही केवळ हेरगिरी नव्हे, तर देशद्रोह आहे. व्हाईट कॉलर भासणारे लोकही देशविरोधी कारवायांमध्ये कसे गुंततात हे या प्रकरणातून स्पष्ट होते.
ज्योतीने पाकिस्तानात दौरा करून तिथल्या अधिकाऱ्यांना मुंबईतील संवेदनशील भागांची माहिती पुरवल्याचा संशय आहे. ती पाकिस्तानच्या ‘दानिश’ नावाच्या अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार मुंबईत चार वेळा आल्याची माहितीही समोर आली आहे. एनआयए आणि पोलिस तपास यंत्रणा तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. फडणवीस म्हणाले, देशाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
एसआयटी चौकशीचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळे विश्रामगृह प्रकरणावरही कठोर भूमिका घेत एसआयटीमार्फत तपास करण्याची घोषणा केली आहे. विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात, विश्रामगृहात मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याचा प्रकार समोर आला होता. या संदर्भात फडणवीस म्हणाले, विधीमंडळ समितीच्या कार्यक्षमतेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर सरकार म्हणून आपले कर्तव्य आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे.
गुलमोहोर विश्रामगृहातील कक्ष क्र. 102 मध्ये ही रोकड सापडल्याची माहिती मिळाल्यावर रात्रीच्या वेळी प्रशासनाची यंत्रणा हलली आणि नोटा मोजणीसाठी यंत्र मागवण्यात आले. मात्र, नक्की किती रक्कम सापडली यावर अद्याप प्रशासन मौन बाळगत आहे. फडणवीसांनी यावर विधानसभाध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या माध्यमातून समिती स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा इशारा दिला आहे.
सरकार कटिबद्ध
एकंदरीत, वैष्णवी हगवणे, धुळे कॅश प्रकरण यांसारख्या घटनांमधून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे हे अधोरेखित होते. मात्र, या प्रत्येक प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रखर आणि स्पष्ट भूमिका घेतली असून “कोणताही दोषी सुटणार नाही” हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.