महाराष्ट्र

Nitin Gadkari : महामार्गावरून शेतामध्ये; गडकरी कुटुंबाची नव्या शेत मार्गाची उभारणी

Onion Farming : विकास पुरुषांच्या भूमित उमलली कांद्यांची मालिका 

Post View : 31

Author

देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांचे जाळे उभं करून विकासाची दिशा दिली, आता त्यांच्या पत्नी कंचन गडकरी यांनी शेतशिवारात नव्या शेती प्रयोगाने चमत्कार घडवला आहे.

देशाचे महामार्ग विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता शेतीतही नावीन्य आणत आहेत. मात्र यावेळी केंद्रस्थानी आहेत त्यांच्या पत्नी कंचन गडकरी. नागपूरजवळील धापेवाडा येथील भक्ती फार्ममध्ये त्यांनी केलेल्या अनोख्या प्रयोगाची चर्चा सध्या कृषी वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने होत आहे. कारण, इथे तयार झालाय 800 ग्राम ते तब्बल 1 किलो वजनाचा प्रचंड लाल रत्‍नप्याज.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः हा प्रयोग जनतेसमोर आणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी केवळ मोठ्या आकाराच्या कांद्यांचे दर्शन घडवले नाही, तर यामागे वापरलेली अभिनव शेतीतंत्र, बियाण्यांची माहिती आणि संपूर्ण प्रक्रियाही मांडली आहे, जी शेतीसाठी प्रेरणादायक ठरू शकते.

विदेशी बियाणं, भारतीय मेहनत

या प्रयोगात वापरले गेलेले बियाणं थेट नेदरलँड्समधून आयात करण्यात आले. सेमिनिस या नामांकित कंपनीच्या 2.5 किलो बियाण्यांची पेरणी एक एकर जमीन या क्षेत्रात केली गेली. प्रारंभी 45 दिवस नर्सरी तयार करून त्यानंतर त्या रोपांची लागवड दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली. ही संपूर्ण शेती पूर्णपणे जैविक पद्धतीने केली गेली. डबल ड्रिप सिंचन प्रणालीचा वापर करण्यात आला, तर जमिनीत जैविक खत मिसळण्यात आले. यानंतर संपूर्ण बेडवर मल्चिंग पेपर टाकून त्यात छिद्र करून कांद्याची लागवड झाली. हे संपूर्ण तंत्रज्ञान शाश्वत आणि पर्यावरणपूरक होते.

या प्रयोगात तब्बल 24 हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. यात केवळ 7 ते 10 टक्के मृत्युदर नोंदवली गेली. जी कृषी क्षेत्रातील तुलनात्मक दृष्टिकोनात फारच कमी आहे. शेवटी, या एक एकरातून तब्बल 12 ते 13 टन कांद्याचे उत्पादन झाले. हे कांदे वजनात सरासरी 400 ग्रामपासून 1 किलोपर्यंत आहेत, जे अत्यंत लक्षणीय आहे. या प्रकल्पामधून गडकरींनी केवळ उत्पादन नव्हे, तर जैविक शेतीसाठी एक दिशादर्शक मॉडेल तयार केले आहे. नितीन गडकरी म्हणतात, कोणताही शेतकरी जैविक शेती करू इच्छित असेल, तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू. हा संदेश केवळ शब्दांत नाही, तर कृतीतून देखील प्रकट झाला आहे.

मार्गदर्शक प्रयोग

खरिप हंगामात महाराष्ट्र, कर्नाटका व आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणावर कांद्याची शेती केली जाते. मात्र निसर्गाच्या लहरीने उत्पादनावर परिणाम होतो आणि त्यामुळे देशात कांद्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी नाशिक, सोलापूर, पुणे बेल्टवरील उत्पादनावर अवलंबून राहण्याऐवजी इतर राज्यांतूनही समांतर व दर्जेदार उत्पादन घेणे गरजेचे आहे. मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये याकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी गडकरी कुटुंबाचा हा प्रयोग देशभरातील शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट प्रेरणा ठरू शकतो.

हा प्रयोग हे दाखवून देतो की आधुनिक तंत्रज्ञान, जैविक दृष्टिकोन आणि नियोजनशुद्ध मेहनत या त्रिसूत्रीने शेतीही नव्या उंचीवर जाऊ शकते. गडकरींसारख्या विकासपुरुषाच्या घरातून आलेली ही शाश्वत शेतीची दिशा, खरंच देशभरातील शेतकऱ्यांनी आत्मसात करावी अशी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!