महाराष्ट्र

Historical Icon : नागपूर रेल्वे स्थानकासाठी रघुजी भोसले नावाची साद

Nagpur : उपराजधानीच्या हृदयात इतिहासाचा ठसा उमटणार

Author

नागपूर रेल्वे स्थानकाला आंबेडकर, हेडगेवार, बख्त बुलंद शहा यांच्यासह इतर महापुरुषांच्या नावांच्या शिफारशीनंतर ऐतिहासिक योध्याचे नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले नागपूर हे केवळ भौगोलिक दृष्टिकोनातूनच नाही, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्वाचे शहर आहे. नागपूरचे मध्यवर्ती रेल्वे स्थानक हे लाखोंच्या प्रवासाचे केंद्र असून, त्याच्या नावाबाबत गेल्या काही दशकांपासून विविध महापुरुषांचे नाव देण्याच्या मागण्या केल्या जात आहेत. या मागण्यांना नुकताच नवा आयाम मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतील पराक्रमी योद्धा आणि नागपूर राज्याचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) यांच्या नावाने हे स्थानक नामांकित व्हावे, अशी मागणी आता त्यांच्या वंशजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

राजे मुधोजी भोसले यांनी लिहिलेल्या पत्रात रघुजी भोसले यांचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह ओरिसा, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोंडवाना या विस्तृत भागात सुमारे 2 लाख 17 हजार 560 चौरस किलोमीटर क्षेत्रावर रघुजी भोसले यांचे अधिपत्य होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार करताना आपल्या 21 वर्षांच्या राजवटीत पराक्रम, प्रशासन आणि सांस्कृतिक स्थैर्य यांची त्रिसूत्री साधली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी सुरू केलेल्या कार्याला भोसले घराण्याच्या नागपूर शाखेने मजबूत पाठबळ दिले, असे राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Devendra Fadnavis : ई-फाईल्स स्वीकारा, आता कागदपत्रांना विसरा

नामांतराची जुनी मागणी

नागपूर रेल्वे स्थानकाच्या नावाबाबतची ही पहिलीच मागणी नाही. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी जोर धरली होती, कारण नागपूर हीच ती भूमी होती, जिथे बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार, नागपूर शहराचे संस्थापक बख्त बुलंद शहा, तसेच ताजउद्दीन बाबा यांच्या नावांचीही नामांतरासाठी शिफारस करण्यात आली होती. हे स्पष्ट होते की नागपूरच्या रेल्वे स्थानकाला नवे नाव देण्याच्या मागणीत श्रद्धा, परंपरा, इतिहास आणि सामाजिक भावनांचा प्रभाव खोलवर आहे.

राजे मुधोजी भोसले यांनी केवळ पंतप्रधान मोदींनाच नव्हे, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र पाठवले आहे. या मागणीला नागपूरच्या नागरिकांमधून आणि विविध संघटनांतून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आता पाहावे लागेल की या ऐतिहासिक मागणीला केंद्र सरकार काय उत्तर देते. एकीकडे विविध समाजघटकांची मागणी असून दुसरीकडे रघुजी भोसले यांसारख्या पराक्रमी योद्ध्याच्या वारशाला गौरव देण्याची संधी. नागपूरच्या इतिहासात या नामांतराची नोंद होईल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Sudhir Mungantiwar : विचारांच्या धाग्याने विणली ज्ञानक्रांतीची नवी शाल

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!