अमरावतीत प्रवासी बसमधून प्रतिबंधित आणि अवैध बियाण्यांची वाहतूक पकडली गेली असून, युवक काँग्रेसने आरटीओकडून प्रत्येक थांब्यावर तपासणी करण्याची मागणी केली आहे.
अवैध पार्सल वाहतुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अमरावतीत युवक काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा ग्राहक परिषदेचे सदस्य आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी जवंजाळ यांनी ट्रॅव्हल्सच्या प्रत्येक थांब्यावर नियमित तपासणी करण्याची ठाम मागणी केली आहे. सध्या प्रवासी बसमधून अवैध आणि प्रतिबंधित मालाची वाहतूक करणे एक गंभीर समस्या ठरत आहे. नुकतेच गुजरातहून नागपूरकडे येणाऱ्या एका खासगी प्रवासी बसमध्ये प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे मोठ्या प्रमाणावर पकडण्यात आले. ही कारवाई अमरावतीतील वेलकम पॉइंट येथे कृषी विभागाच्या सतर्क पथकाने केली.
सुमारे 25 लाख रुपये किमतीचे बियाणे अवैधरित्या प्रवासी बसमधून पार्सलच्या स्वरूपात वाहिले जात होते.यामुळे प्रवासी बसमधून अवैध माल वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वस्तू प्रवासी वाहनातून नेल्या जात असताना परिवहन विभागाच्या दुर्लक्षाची बाब गंभीर असल्याचे जवंजाळ यांनी स्पष्ट केले. या प्रकारांमुळे प्रवासी सेवांचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अवैध वस्तूंमुळे प्रवाशांच्या सामानात अडथळा निर्माण होतो. तसेच अपघात किंवा आग लागण्याचा धोका देखील वाढतो. अशा घटनांमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होतो आणि कायद्याच्या दृष्टीनेही हे चिंताजनक आहे.
Nitin Gadkari : प्रकल्पांचे भूमिपूजन म्हणजे केवळ निवडणुकीचे हत्यार
आरटीओने तपासणी वाढवावी
जवंजाळ यांच्या मते, फक्त पोलिस किंवा कृषी विभागानेच नव्हे तर आरटीओ विभागानेही या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक बस थांब्यावर नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. विशेषतः वेलकम पॉइंट, तसेच इतर प्रमुख स्थानकांवर हे अभियान राबवले पाहिजे. याशिवाय, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्या कंपन्यांचे परवाने तपासून दंडात्मक कारवाई व्हायला हवी. संबंधित वाहन चालक आणि मालकांविरोधात परिवहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवले जावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली.
विशेषतः गुजरातहून नागपूरकडे आणि अन्य प्रमुख मार्गांवर अशा अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी प्रवासी ट्रॅव्हल्स कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत. भविष्यात अशा प्रकरणांवर कठोर नजर ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही निगराणी आणि प्रवाशांच्या सहकार्याने तपासणीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. या संदर्भात शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील आरटीओ आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे लक्ष वेधले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम सर्वच स्तरांवर प्रभावीपणे राबवली जावी, असा सूर उमटत आहे. या कारवाईनंतर आता अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारांवर लक्ष केंद्रित केले जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते