नागपूरच्या गल्ल्यांमध्ये आता आरोग्याची गाडी धावतेय, ज्यात नाही मोठं हॉस्पिटल, पण आहे जीव वाचवणारी सेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून, गरजू नागरिकांसाठी मोफत फिरती आरोग्य सेवा सुरू झाली आहे.
नागपूर शहराच्या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी एक दिलासाद व आरोग्यदायी आशा घेऊन फिरती हॉस्पिटल्स आता तुमच्या दारी येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली, नागपूरच्या गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आरोग्य उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ तपासणीपुरता मर्यादित नाही. जीवनशैली सुधारणा व व्यसनमुक्तीपर्यंतचा व्यापक आरोग्यदृष्टीकोन घेऊन पुढे येतोय.
सॅनोफी इंडिया लिमिटेड, नागपूर महानगरपालिका आणि पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन व संशोधन संस्था (PSMRI) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत दोन अत्याधुनिक मोबाइल मेडिकल युनिट्स (एमएमयू) नागपूरच्या रस्त्यांवर कार्यान्वित झाल्या आहेत. सॅनोफीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत या सेवांचे संचालन करण्यात येत आहे. त्याचा थेट लाभ नागपूरमधील वंचित, गरजू व दुर्लक्षित घटकांतील नागरिकांना मिळणार आहे.
वेळेत उपचार
मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे 30 वर्षांवरील सुमारे दोन लाख नागरीकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तोंडाच्या कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रारंभीच निदान करून, रुग्णांना वेळेत उपचार अथवा पुढील रुग्णालयीन सेवेसाठी पाठविण्याचे काम ह्या युनिट्समधून केले जात आहे.
या युनिट्स केवळ उपचार देत नाहीत, तर आरोग्यविषयक जनजागृती, जीवनशैलीमध्ये सुधारणा, आहार व व्यसनमुक्तीविषयी सल्ला देण्याचेही मोलाचे कार्य करत आहेत. यामुळे या उपक्रमाचे स्वरूप हे केवळ वैद्यकीय मदतीपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण जीवनशैलीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय
आरोग्यसेवा पुरविणारा
युनिट्स शहरातील आझाद कॉलनी, बडा ताज, बीडी पेठ, बिनाकी, छोटा जात, धंतेश्वरी नगर, धरम पेठ, डॉ. आंबेडकर नगर, एकात्मता नगर, गिट्टीखदान, गोपाल नगर, जैताळा, जयंती नगर, महात्मा फुले चौक, नंदनवन, पाचपोळी यांसारख्या ठिकाणी दररोज फिरत असतात. झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये नियमित आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे.
या संपूर्ण उपक्रमामागे ‘स्वास्थ्य हेच संपत्ती’ हे तत्व ध्यानात घेऊन नागपूर महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत केलेला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे. ही संकल्पना भविष्यात इतर शहरांमध्येही आरोग्यसेवेच्या परिवर्तनाचे आदर्श मॉडेल ठरू शकते.