राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन पेटलं असून काँग्रेसने त्याला थेट पाठिंबा दिला आहे. सरकारच्या समित्यांच्या खेळावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल करत तात्काळ कर्जमाफीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कडू यांनी आंदोलनाला स्थगिती देत सरकारला मुदत दिली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळताना दिसत आहे. एकीकडे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेदेखील या आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर करत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले की, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही आमची स्पष्ट भूमिका आहे. बच्चू कडूंचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असून, काँग्रेस त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे.
वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं, मुंबईतील कोट्यवधींच्या जमिनी उद्योजकांना सहज दिल्या जातात. लाखो कोटींचे प्रकल्प एका झटक्यात मंजूर होतात. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे डोळे का झाकले जातात? त्यांना मदत करताना सरकारच्या हातांना लकवा का मारतो? सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावर टीका करत वडेट्टीवार म्हणाले, ज्या सरकारने निवडणुकीत हमीभाव, बोनस आणि कर्जमाफी याची ग्वाही दिली होती, तेच आता समिती नेमून वेळकाढूपणा करत आहे. हे शेतकऱ्यांच्या भावना आणि आयुष्याशी खेळणं आहे.
सरसकट कर्जमाफी
वडेट्टीवारांनी अधिक पुढे जात सरकारच्या पोकळ धोरणांवर निशाणा साधला. राज्यात महाविकास आघाडीच्या काळात सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला होता. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला होता. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी खोटी आश्वासनं देऊन केवळ निवडणूक जिंकल्या. आता त्या खोट्या वचनांचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तरीसुद्धा सरकारने अद्याप ठोस मदत केली नाही. अशा स्थितीत समिती नेमण्याऐवजी थेट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, ही काँग्रेसची मागणी आहे. शेवटी वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी हा या देशाचा कणा आहे. तो जर अश्रूंमध्ये जगत असेल, तर देश कितीही झगमगला, तरी खरी प्रगती अधुरीच राहील. सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने बघावे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त चर्चा नाही, तर त्वरित कृती करावी.
Parinay Fuke : धान उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा, बोनस मिळाला…
बच्चू कडू यांनी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला स्थगिती दिली आहे. परंतु कडू यांनी सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही सर्व थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल.
