महाराष्ट्र

Prakash Ambedkar : पंतप्रधान भित्रट भागुबाई 

Indo - Pak War : शस्त्रसंधीवरून प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला पुन्हा फटकारले

Share:

Author

पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलायची संधी असूनही केंद्र सरकारने ती गमावली, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मोदी सरकारचं नेतृत्व भित्रं आणि दबावाखाली झुकलेलं असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भारत पाकिस्तान युद्धावरून पंतप्रधानांवर पुन्हा टीका केली आहे. हे केवळ युद्ध नव्हतं, ती इतिहास लिहिण्याची वेळ होती. पण केंद्र सरकारने ती सुवर्णसंधी वाया घालवली, अशा थेट शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर जबरदस्त हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची संधी असूनही केंद्राने मागे सरकून देशाची ऐतिहासिक गरज झटकली, असा आरोप आंबेडकरांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “भित्रट भागूबाई” आणि “कणा नसलेले नेतृत्व” अशा तीव्र शब्दांत, त्यांनी टीका केली.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी सीमेवर लष्करी वर्चस्व मिळवले होते. भारतीय वायुदल केवळ तीन दिवसांत नियंत्रणावर आले होते. पाकिस्तानकडे ना पुरेसे शस्त्रास्त्र होते, ना सात दिवसांच्या युद्धाची ताकद. अशा वेळी 1971 मधील इतिहास पुन्हा घडवण्याची नामी संधी आपल्या हाती होती. पण केंद्र सरकारने अघोषित युद्धबंदी करत ती संधी गमावली, असा आरोप त्यांनी केला.

कायमचा बंदोबस्त 

आंबेडकर पुढे म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने देशात सातत्याने दहशतवादी हल्ले झाले. पहलगाम हल्ल्यानंतर केवळ दहशतवाद नव्हे, तर पाकिस्तानच्या मुळावर घाव घालण्याची संधी आपल्याकडे होती. पण केंद्राने तो मार्ग न स्वीकारता, संयमाचा मुखवटा घालून माघार घेतली. ही भूमिका देशाच्या सुरक्षेशी गद्दारी करणारी आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलं, पाकिस्तानप्रश्नी झालेल्या हालचालींचं नियंत्रण अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात होतं. त्यांनीच ठरवलं की युद्ध किती दिवस चालेल आणि केव्हा थांबेल. या हस्तक्षेपाविरोधात मोदी सरकारने एक शब्दही काढलेला नाही. ट्रम्पचा खुला दावा मोदींनी खोडून काढण्याची हिम्मत दाखवलेली नाही.

Devendra Fadnavis : महापालिकेच्या गाभाऱ्यात सत्ता स्थापनासाठी ‘देवेंद्र मंत्र’ 

सडकून टीका 

इराणसारखा छोटा देश देखील ट्रम्पपुढे न झुकता उभा राहतो. पण भारतासारखा महासत्ता होण्याचा दावा करणारा देश अमेरिकेच्या इशाऱ्यावर निर्णय घेतो, हे दुर्दैव आहे. नरेंद्र मोदी हे केवळ भित्रे भागूबाईच नाहीत, तर त्यांच्यात स्वाभिमान आणि कणाही शिल्लक राहिलेला नाही, अशी आक्रमक टीका आंबेडकरांनी केली.

शस्त्रसंधी का जाहीर करण्यात आली? पाकिस्तानच्या मुळावर का घातला नाही? ट्रम्पच्या दबावामुळे निर्णय घेतला का? देशाची संरक्षणनीती परकीय हस्तक्षेपाने ठरते का? या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारने देशासमोर मांडावी, अशी मागणी करत आंबेडकरांनी मोदी सरकारच्या राष्ट्रवादाच्या दाव्यालाही आव्हान दिलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!