महाराष्ट्र

Bacchu Kadu : सातबारा कोरा कोरा, नाही तर…

Farmer Loan Waiver : आश्वासनांच्या ताटातूटीनंतर पदयात्रेचा मारा

Author

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. उपोषणानंतर आता सातबारा कोरा’करण्यासाठी ते पदयात्रा मोहीम सुरू करणार आहेत.

राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा संघर्षाचं नाट्य रंगताना दिसतंय. केंद्रस्थानी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेहमीच रस्त्यावर उतरलेले बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या मनोऱ्याला हादरवणाऱ्या या लढवय्या नेत्याने आता आंदोलनाची नवी दिशा जाहीर केली आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांनी आपल्या गावी परत जाऊन पेरणीला सुरुवात करणं गरजेचं असल्यामुळे गुरुकुंज मोझरीतील अन्नत्याग आंदोलन तूर्तास थांबवण्यात आले आहे.

ही केवळ विश्रांती नाही तर पुढील संघर्षाची पूर्वतयारी असल्याचा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे. त्यांच्या लढ्याचा सूर तितकाच तीव्र आहे.शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसह विविध घटकांच्या न्यायहक्कासाठी बच्चू कडूंनी आता नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 7 जुलैपासून अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून यवतमाळच्या चिलगव्हाण (पहिली शेतकरी आत्महत्या झालेलं गाव) आंबोडा पर्यंत 138 किलोमीटरची भव्य पदयात्रा काढली जाणार आहे. गुरुकुंज मोझरीत आठ दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारकडून लेखी आश्वासन मिळाले होते. मात्र, अनेक मागण्या अद्याप कागदावरच असल्याने बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत.

Parinay Fuke : भाषा प्रेमाचा ड्रामा, पण ग्लासात मात्र इंग्रजीच

संघर्षाचा पुढील टप्पा

कडूंच्या घोषणेचा थेट परिणाम म्हणजे ‘सातबारा करून घेऊ कोरा, नाहीतर सरकारचे वाजवू बारा’ असा आक्रमक नारा. ही पदयात्रा दोनद, उंबर्डा बाजार, लोही, तरणोडी, मानकी, तळेगाव, दारव्हा, वळसा, लाखखिंड, तिवरी, चिरकूटा, तूपटाकळी, वसंतनगर, काळी दौलत, माळकिन्ही, गुंज या गावांतून मार्गक्रमण करणार आहे. सात दिवसांत आंदोलनाचा हा वणवा गावागावात पोहोचणार आहे. पदयात्रेदरम्यान प्रत्येक गावात सभा, संवाद, आणि स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या यात्रेला केवळ राजकीय उपक्रम न मानता, लोकशाहीत लोकांच्या हक्कासाठीची चळवळ म्हणून पाहिलं जात आहे.

बच्चू कडू स्पष्टपणे सांगतात की, ही यात्रा कोणत्याही एका नेत्याची नाही. तर शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, विधवा आणि दिव्यांग बांधवांची आहे. या लोकांचा आवाज आता सरकारला ऐकावाच लागेल.ते पुढे म्हणाले, आम्ही मागण्या काही खाजगी स्वार्थासाठी करत नाही. या मागण्या देशाच्या पिळवटलेल्या शेतकऱ्यांच्या आणि दुर्लक्षित घटकांच्या आहेत. सरकारने यावर तोडगा काढलाच पाहिजे.शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम लावणं हे केवळ घोषणांमधून शक्य नाही, तर कृतीतूनच शक्य आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन सरकारसाठी केवळ इशारा नाही तर गंभीर आव्हान आहे. 7 जुलैपासून सुरू होणारी ही पदयात्रा शेवटी काय वळण घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Prakash Ambedkar : अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी जागतिक महासत्ता भिडणार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!