
शिवसेना शिंदे गट सध्या अकोल्यात अंतर्गत कलहाच्या ज्वाळेत सापडली असून बाजोरिया विरोधातील संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवसैनिकांचे काका’ अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटात सध्या समस्या आणि गोंधळ वाढत आहे. अकोला, अमरावती असो वा नागपूर शिंदे गटातील अंतर्गत कलह सध्या टोकावर पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी पक्षातील मोठ्या नेत्यांना विरोध होत आहे. नागपूर मध्ये जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी सर्वेक्षण होणार आहे. अकोला देखील या वादळापासून सुटलेला नाही. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात मध्यंतरीच्या काळात तीव्र आंदोलन झालं होतं. बाजोरिया यांचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यानंतर बाजोरिया यांचे अधिकार मर्यादित करण्याची माहिती शिवसेनेतील मुंबईतील नेत्यांनी दिली. अशा परिस्थितीत आता शिवसैनिकांचे लाडके काका म्हणजेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे अकोलात येणार आहेत.
शिवसैनिक प्रतापराव जाधव यांना आदराने आणि प्रेमाने काका म्हणून संबोधतात. आता अकोल्यातील बाजोरिया विरोधी पुतण्यांना काका कोणता मंत्र देतील? शिवसेनेतील बंड कसं शमवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अकोल्यातील दौऱ्यामध्ये काका हे मित्र पक्षाचे नेते विजय देशमुख यांची भेट घेणार आहेत. विजय देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. यापूर्वी देशमुख यांनी महापालिकेत आपला सत्ताकाळ गाजविला आहे. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचे कार्यकाळ लवकरच संपणार आहे. मिटकरी यांच्या जागेवर आता अजितदादा विजय देशमुख यांना संधी देतील, असे निश्चित मानले जात आहे.

नीट अँड क्लीन प्रतिमा
अजितदादा यांच्या मनात सध्या विजय देशमुख यांची प्रतिमा नीट अँड क्लीन आहे. विजय देशमुख लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणतेही वादात सापडले नाहीत. आजपर्यंत अजितदादांना डोकेदुखी होणार, अशी वायफळ बडबड आणि चमकोगिरी तर अजिबातच देशमुख यांनी केली नाही. आजपर्यंत अजित दादा यांना विजय देशमुख यांना कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झापण्याचीही गरज पडली नाही, इतके देशमुख हे समजदार आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे आमदारकीसाठी अजितदादा देशमुख यांना संधी देतील, असे सांगण्यात येत आहे.
प्रतापराव जाधव अकोल्यात विजय देशमुख यांची भेट घेणार आहेत. प्रतापराव जाधव आणि विजय देशमुख यांचे शिवसेनेमध्ये असतानापासून चांगले व्यक्तिगत संबंध आहेत. दोघेही सध्या वेगवेगळ्या मित्र पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही विजय देशमुख यांना पाठिंबा देणार, असे संकेत यातून मिळत आहेत. शिवसेनेची बंडखोरी झाली त्यानंतर आणि शिवसेना स्थापना दिवसानंतरचा प्रतापराव जाधव यांचा हा अकोल्यात पहिला दौरा आहे.
दौऱ्याबाबत सूचना
बाजोरिया यांच्या विरोधातील आंदोलनामध्ये प्रतापराव जाधव यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या वादापासून प्रतापराव जाधव यांनी आतापर्यंत स्वतःला अलिप्त ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील जे मोठे नेते आहेत, त्यांच्या मनात जाधव यांचे स्थान अद्यापही चांगले आणि कायम आहे. तर कदाचित महापालिका निवडणुकीपूर्वी जाधव यांना दौरा करण्याबाबत सूचना देण्यात आली असावी, असे सांगण्यात येत आहे. जाधव यांचा हा दौरा आगामी महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे प्रतापराव जाधव यांचे भाजपच्या नेत्यांशी देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
प्रतापराव जाधव आणि अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील नेते आहेत. आकाश फुंडकर आणि प्रतापराव जाधव यांचे बुलढाणा जिल्ह्यात देखील संबंध चांगले आहेत. योगायोगाने हेच दोघही मंत्री अकोल्याच्या भाजप आणि शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. या दोघांचेही सामंजस्याने महायुती अकोल्यात महापालिका निवडणुकीमध्ये घोडदौड करणार, असे संकेत मिळत आहेत.