
17 मार्च 2025 रोजी उपराजधानी नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपींबाबत नागपूर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
शांततेचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर 17 मार्चच्या रात्री अचानक धगधगू लागलं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये उफाळलेला वाद काही क्षणातच हिंसक रूप धारण करतोय, याची कुणालाही कल्पना नव्हती. दगडफेक, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि थेट पोलिसांवर हल्ले या सर्व घटनांनी नागपूर हादरलं. या दंगलीत अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले. पोलीस यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. पण वेळ वाया न घालवता पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली आणि जवळपास 200 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले.
घटनेची दखल थेट दिल्लीपर्यंत घेतली गेली होती. या प्रकरणातील मोठी बातमी आता समोर आली आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाने महाल हिंसाचार प्रकरणातील तब्बल 80 आरोपींना अटींसह जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विशेष म्हणजे याआधी या प्रकरणातील 9 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला होता. त्याच आदेशाचा दाखला देत जिल्हा न्यायालयाने उर्वरित 80 जणांचाही मार्ग मोकळा केला आहे. जामीन मिळालेल्या आरोपींमध्ये मोहम्मद हारीश इस्माईल, मोहम्मद शाहनवाज शेख, मोहम्मद युसूफ शेख, नसीम सलीम शेख यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

Parinay Fuke : सहकारात पुन्हा एकदा विजयाचा चेंडू सीमा रेषेपार
कठोर अटींसह जामीन
सर्वांनी स्वतंत्रपणे जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी ठामपणे सांगितले की पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत. फक्त गुप्त माहितीच्या आधारावर अटक करण्यात आली. कथित मुख्य आरोपी फहीम शमीम खानच्या ‘सनी यूथ फोर्स’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी त्यांचा कोणताही संबंध नाही. इतकंच नाही तर ओळख परेडीत देखील आरोपींची ओळख पटलेली नाही. या मुद्द्यांवर आधारित युक्तिवादामुळे कोर्टाने जामीन मंजूर केला.कोर्टाने प्रत्येक आरोपीला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अटीही कठोर आहेत.
आठवड्यातून दोन वेळा संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, तसेच तपासात व न्यायालयीन कार्यवाहीत सहकार्य करणे अनिवार्य आहे. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष फहीम शमीम खान यांचा जामीन अर्ज सध्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे. न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला आहे. आता या अर्जावर 4 जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. फहीम खान याच्यावर गंभीर आरोप आहेत की, हिंसाचार घडवण्यासाठी त्याने सक्रिय भूमिका बजावली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आता इतर 80 आरोपींना जामीन मिळाल्यानंतर नागपूरकरांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या मुख्य आरोपीच्या जामीन निर्णयाकडे लागले आहे.