
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरचा सर्वांगीण विकास झपाट्याने सुरू आहे. या विकासाच्या गाडीवर आता पर्यटन विकासाचा नवा डब्बा देखील जोडण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या नेतृत्वात राज्याचा विकास वेगाने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकास’ हेच आपल्या कार्यकर्तृत्वाचे मुख्य शस्त्र बनवले असून, याचा ठसा त्यांच्या गृहजनपदात नागपूरमध्ये स्पष्टपणे उमटत आहे. नागपूर आता केवळ उपराजधानी किंवा डिफेन्स हब नाही, तर एव्हिएशन हब म्हणूनही नावारूपाला येत आहे. आता यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे जंगल सफारीचे. नागपूरकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. कारण ‘अफ्रिकन सफारी’ आता थेट नागपूरमध्ये उभारली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. हा करार ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्प’च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात तब्बल 63 हेक्टर क्षेत्रात अफ्रिकन सफारी साकारली जाणार आहे. या सफारीत आफ्रिकेतील सुमारे 22 दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा समावेश असेल.

Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं
जैवविविधता संवर्धन महत्त्व
पर्यटकांना आता थेट नागपूरमध्ये आफ्रिकन सिंह, चित्ता, ठिपकेदार तरस, रेड रिव्हर हॉग, चिंपांझी आणि पांढराशिंगी गेंडा पाहण्याची संधी मिळणार आहे. या अफ्रिकन सफारीत केवळ भक्षक प्राणीच नव्हे, तर मुक्त संचार करणारे अनेक वन्य जीवही दिसणार आहेत. शहामृग, जिराफ, झेब्रा, ब्लू विल्डबीस्ट, कुडू, इम्पाला, कॉमन ईलंड, जेम्स बॉक आणि पाणगेंडा यांसारख्या प्राणीप्रजाती पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. ही सफारी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, जैवविविधतेचे जतन, संवर्धन आणि पर्यावरण जागृती यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागपूरकरांसाठी आणि देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे एक नवे आकर्षण ठरणार आहे.
प्रकल्पासाठी अंदाजे 285 कोटींचा भरीव निधी निश्चित करण्यात आला आहे. येत्या 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. NBCC ही केंद्र सरकारची प्रतिष्ठित संस्था या बांधकामाची जबाबदारी पार पाडणार आहे. याआधी ‘इंडियन सफारी’ प्रकल्पाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन 26 जानेवारी 2021 रोजी पार पडले. त्या यशानंतर आता दुसऱ्या टप्प्यात अफ्रिकन सफारीचा भव्य आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यात येत आहे.अफ्रिकन सफारी प्रकल्पामुळे नागपूर आता प्राणीसंग्रहालय पर्यटनाच्या नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.
नागपूर हे फक्त उपराजधानी म्हणूनच नव्हे, तर पर्यावरण पर्यटनासाठीही देशभरात प्रसिद्ध होईल. यावेळी राज्याचे मंत्री गणेश नाईक, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि NBCC प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दूरदृष्टीमुळे नागपूरचा चेहरामोहरा अक्षरशः बदलत आहे. विकासाच्या या गाडीत आता जंगल सफारीचाही नवा डबा जोडला गेला आहे.