
सभागृहातील वातावरण आज ढगाळ नव्हतं, पण तरीही एक वादळ घोंगावत होतं, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आत्महत्यांच्या वेदनांनी भरलेलं. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधीमंडळात राजकीय गरजांनी नव्हे, तर बळीराजाच्या दुःखाने खळबळ उडवली.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा 2 जुलै रोजी तिसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्फोटक ठरला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा विषय उपस्थित होताच, सभागृहातील वातावरण एकदम तापलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या साऱ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी होती बळीराजाची वेदना.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला रोखठोक प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. त्यांनी ठामपणे सांगितले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या अडचणी हे केवळ चर्चा करण्याचे विषय नाहीत, तर संवेदनशीलतेने हाताळण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे आणि या सरकारने कधीही शेतकऱ्यांना एकटे सोडलेले नाही आणि सोडणारही नाही.

कृतीतून विश्वास
पवार पुढे म्हणाले, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचा आधार घेत राजकारण करू नये. आम्ही केवळ बोलत नाही, तर कृतीतून विश्वास देतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे कल्याण हे आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयमाने आणि आत्मविश्वासाने सांगितले की, सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणारी नाही. उलटपक्षी, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने, पारदर्शकपणे संवाद साधण्यास तयार आहोत.
वेदना आम्ही अनुभवल्या
अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे, कारण त्यांच्या वेदना आम्ही जवळून अनुभवल्या आहेत. पण काही विरोधकांना या भावनांचा राजकीय बाजार मांडायचा आहे. ही वृत्ती आम्ही कधीही सहन करणार नाही. ते म्हणाले, विरोधक उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करू शकतात. त्यांना ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आजचा गोंधळ हा केवळ संधी साधण्याचा राजकीय प्रयत्न होता, बळीराजाच्या हिताचा नव्हता. शेवटी अजित पवार यांनी सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत ठाम शब्दांत सांगितले, “शेतकरी संकटात असताना सरकार त्याच्या पाठीशी उभे आहे आणि कायम राहणार आहे. कोणतीही समस्या असो, आमचे सरकार ती सोडवण्यास कटिबद्ध आहे.