महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : जेव्हा साधा कार्यकर्ता अध्यक्ष होतो, तेव्हा सिस्टिम हादरते

BJP : चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्षपदावरून घेतला कार्यकर्त्यांचा पत्रातून निरोप

Author

भाजपचे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून निरोप घेतला. भिंती रंगवणारा कार्यकर्ता अध्यक्ष झाला, हेच माझ्यासाठी चमत्कार आहे, असे ते म्हणाले.

पक्षाच्या भिंती रंगवणारा कार्यकर्ता, एके दिवशी त्या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आज तो राज्याचा महसूलमंत्री आहे. भारतीय जनता पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवून भावनिक पत्रातून कार्यकर्त्यांचा धन्यवाद केले आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत मनस्वी शैलीत मांडत पक्षासाठी जीव ओतणाऱ्या कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानला आहे.

कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे, या काव्यपंक्तींप्रमाणे माझी अवस्था आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीचा एक भावनिक आढावा घेतला. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार करत, सायकलवरून आणि पायी प्रवास करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या पंक्तीतून नेतृत्वाच्या शिखरापर्यंतचा प्रवास केला.

शिवधनुष्य उचललं अन् समर्थपणे पेललं

12 ऑगस्ट 2022 रोजी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं हातात घेताना त्यांनी आनंदाबरोबरच जबाबदारीचं ओझंही स्वीकारलं. त्यांनी लिहिलं, “ही जबाबदारी म्हणजे शिवधनुष्य होतं. उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, फडणवीस, मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पदाची शान राखणं हे सोपं नव्हतं. मात्र, कार्यकर्त्यांच्या साथीनं मी हे शिवधनुष्य समर्थपणे पेललं.

अध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बूथवरील कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत समन्वय साधत, राज्यातील संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भाजप हा राज्यातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Vijay Wadettiwar : श्रीमंतांचा बंगला वाचविण्यासाठी लोकवस्ती बुडविणार 

अपयशाची जाणीव, यशाची श्रीमंती

अध्यक्षीय कार्यकाळात दोन मोठ्या निवडणूक आल्या. लोकसभा निवडणुकीतील अपयशाने खिन्न झालो होतो. मात्र, मोदी, शाह, नड्डा, आणि फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आपण उभं राहिलो आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणलं. हे यश माझं नाही, कार्यकर्त्यांचं आहे, असं त्यांनी ठामपणे नमूद केलं. पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत प्रदेशाध्यक्ष म्हणून योगदान देण्याची संधी मिळणं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. आता महसूलमंत्री म्हणूनही त्याच प्रामाणिकतेनं काम करत राहीन, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राष्ट्र प्रथम

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, हा प्रवास केवळ माझा नाही, तो प्रत्येक त्या कार्यकर्त्याचा आहे ज्यांनी मला साथ दिली. आपण सर्वांनी राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः या ब्रीदाने काम केलं आहे आणि पुढेही करायचं आहे, अशी साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली. पत्राच्या शेवटी भावूक होत ते म्हणतात, कधी रागावलो असेन, चुका घडल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. आपल्या सर्वांच प्रेम आणि विश्वास असाच कायम राहो, हीच माझी विनंती आहे. आई जगदंबेच्या आशीर्वादाने जीवात जीव असेपर्यंत कार्य करत राहीन.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!