महाराष्ट्र

Taluka President : कामगिरीला ‘हाय’ अन् नातेवाईकांना ‘बाय-बाय’

Congress : काँग्रेसच्या घरात आता मुलाखतीचा दरवाजा 

Author

काँग्रेसने तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच थेट मुलाखतींचा मार्ग स्वीकारत पक्ष संघटनेत पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. यामार्फत मैदानात खरं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट संधी मिळत आहे.

राजकारणात अनेकदा पक्षपात, गटबाजी आणि वरपासून खाली दिली जाणारी नियुक्ती ही एक अघोषित परंपरा मानली जात होती. मात्र काँग्रेसने यंदा या साचलेल्या पद्धतीला छेद देत थेट मुलाखतीद्वारे तालुकाध्यक्षांच्या निवडीत पारदर्शकतेचा नवा प्रयोग सुरु केला आहे. या नव्या प्रक्रियेने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे, तर काँग्रेसच्या अंतर्गत व्यवस्थापनातील बदलाचा एक नव्या प्रकारचा सिग्नलही दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यभर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या शोधासाठी एक अनोखी पद्धत स्वीकारली आहे. पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच थेट मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या आतापर्यंतच्या इतिहासात हे एक वेगळं आणि थेट मैदानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बाजूने गेलेलं पाऊल ठरतं आहे.

मैदानात उतरणाऱ्याला संधी

या निर्णयामागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची दूरदृष्टी असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी आतापर्यंत स्वतः मुलाखती घेऊन तब्बल 83 तालुकाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे, यामध्ये कोणत्याही नेत्याच्या शिफारसीवर किंवा गटबाजीतून निर्णय न होता केवळ कार्यकर्ता किती मैदानात उतरलाय, काय कामगिरी केलीय आणि पक्षासाठी भविष्यात काय करू शकतो, या बाबींचा विचार केला गेला आहे.

आजपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या पार पडल्या आहेत. यामध्ये अकोला (8), बुलढाणा (19), चंद्रपूर (2), अमरावती (2), यवतमाळ (1), जळगाव (8), सिंधुदुर्ग (1), उल्हासनगर (1), रत्नागिरी (6), ठाणे शहर (3), ठाणे ग्रामीण (5), अहिल्यानगर (3), सांगली (2), पुणे (2), सोलापूर (1), धाराशिव (1), जालना (7), हिंगोली (2), संभाजीनगर (6), बीड (3). प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी उर्वरित तालुक्यांतील नेमणूक लवकरच घोषित होतील, असं स्पष्ट केलं.

Chandrashekhar Bawankule : जेव्हा साधा कार्यकर्ता अध्यक्ष होतो, तेव्हा सिस्टिम हादरते

काम करणाऱ्यांचा सन्मान

काँग्रेसच्या नव्या पद्धतीमुळे अनेक जुन्या सवयींना ब्रेक लागला आहे. पक्षाच्या अंतर्गत वातावरणात एक प्रकारचं स्पर्धात्मक चैतन्य” निर्माण झालं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत जी पदे गटातल्या वजनावर मिळायची, ती आता कामगिरीच्या रिपोर्ट कार्डवर मिळत आहेत. या प्रक्रियेचा हेतू, पक्षाच्या खालच्या थरातील कार्यकर्त्यांना संधी देऊन, त्यांचं नेतृत्व उभं करणं आहे. हे केवळ एका नियुक्तीचा प्रश्न नसून, पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल घडवण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.

या निवड प्रक्रियेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. जर ही प्रक्रिया खरोखर पारदर्शक राहिली आणि निकाल फक्त कामगिरीवर आधारित राहिले, तर काँग्रेसला संघटनात्मकदृष्ट्या नवी ऊर्जा मिळू शकते, असे बोलले जात आहे. मात्र हे फक्त सुरुवातीचं पाऊल आहे. या निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना आता स्वतःची क्षमता दाखवून पक्षाला उभं करावं लागेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!