महाराष्ट्र

Pravin Datke : जिथं दहशत नाचायची, तिथं प्रगतीचे पायघडे अंथरलेत

Monsoon Session : माओवादाच्या सावलीतलं गडचिरोली आता स्मार्ट सिटीच्या उजेडात

Author

पावसाळी अधिवेशनाच्या राजकीय गर्जनेसह गडचिरोलीच्या परिवर्तनाचा झंकार सभागृहात उमटला. प्रवीण दटके यांनी माओवाद्यांच्या छायेतून विकासाच्या प्रकाशात वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीची प्रभावी कहाणी मांडली.

राज्यात पावसाळी हवेसह सध्या विधानभवनातही राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. प्रश्‍न, उत्तरं, आरोप-प्रत्यारोपांच्या या गडगडाटात अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (3 जुलै) एक आवाज वेगळा ठसा उमटवून गेला. तो होता भाजपचे आमदार प्रवीण दटके यांचा. त्यांच्या आवाजात होता आत्मविश्वास, आकडे नव्हे तर वास्तवाची चाहूल आणि शब्दांमध्ये होता बदललेल्या गडचिरोलीचा झळाळता प्रतिबिंब.

दटके यांनी सभागृहात उभं राहताच गडचिरोलीच्या रूपांतरणाची कहाणी मांडली. कधी माओवादी अंमलाने ग्रासलेला, दुष्काळ व भयाचे सावट पसरलेला, लोकांच्या मनात ‘नकोसा’ वाटणारा गडचिरोली जिल्हा, आज ‘लोह नगरी’ बनू लागला आहे. गडचिरोलीकडे आधी लोक वाईट जिल्हा म्हणून बघायचे. मात्र आता महायुती सरकारमुळे इथं परिवर्तनाची नवी दिशा सुरू झाली आहे, असं सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयांना सलाम केला.

शरण आलेल्यांना संधी

महायुतीच्या सरकारच्या शौर्याचा जयघोष करत प्रवीण दटके म्हणाले, जिथे माओवाद्यांचा अंधार होता, तिथे आता विकासाच्या प्रकाशरेषा उमटू लागल्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली महायुती सरकारने माओवाद्यांचा बंदोबस्त करताना सामान्य जनतेला कुठलाही त्रास होऊ दिला नाही. आज त्या माओवादी विचारांनी शरण आलेल्यांना रोजगार, संधी आणि समाजात पुनर्स्थापना दिली जात आहे.

गडचिरोली आता महाराष्ट्रातील जमशेदपूर बनू पाहतंय. एक ‘लोह नगरी’ म्हणून गडचिरोली उभी राहत आहे, असं उद्गारून दटके यांनी या भागातील खनिज संपदेच्या विकासावर भर दिला. हे फक्त स्वप्न नाही, तर पायाभूत बदलांचं फलित आहे, हे त्यांच्या सुरातून ठळकपणे उमटलं. अधिवेशनात दटके यांनी आणखी एका मुद्द्यावर भर दिला. तो म्हणजे ‘स्मार्ट महाराष्ट्रा’च्या दिशेने होणारी प्रगती. इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS), सिटी सर्वेलेन्स कॅमेरे, मेट्रोसारख्या सुविधा, अशा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारीला चाप बसवण्याचं काम सुरू आहे.

Bombay High Court : न्यायालयीन आदेशांना अधिवेशनाचं झाकण

न्याय देणारे सरकार

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आयटीएमएस आणि सिटी सर्वेलेन्समुळे गुन्हेगारी कमी झाली आहे. ट्राफिक व्यवस्थापन योग्य रितीने होत आहे. म्हणूनच अशा सुविधांचा विस्तार अधिक जिल्ह्यांमध्ये करावा, अशी विनंतीही त्यांनी सभागृहात मांडली. दटके पुढे म्हणाले, हे केवळ सत्तेचं सरकार नाही, हे न्याय देणारं आणि सर्वसामान्यांच्या बाजूने उभं असणारं सरकार आहे. विकास आणि शांततेचा समतोल साधणं हीच याची खरी ताकद आहे, असं म्हणत त्यांनी सरकारचे आभार मानले.

अधिवेशनात फक्त विरोधकांचे आवाज नसतात, कधी कधी विकासाच्या दिशा दाखवणारे, परिवर्तनाचं आश्वासन देणारे आवाजही घुमतात आणि प्रवीण दटके यांचा आवाज त्याच स्वरांतला होता. महाराष्ट्राच्या नव्या पर्वाला दिशा देणारा हा क्षण होता. जिथे गडचिरोलीसारखा जिल्हा अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करू लागला आहे आणि हे सर्व शक्य झालंय, एका दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!