महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : व्हॅन खरेदीत भ्रष्टाचाराचा ‘कॅन्सर’

Monsoon Session : अधिवेशनात प्रश्नांचा भडिमार; वडेट्टीवार यांचा सरकारला हिसका

Author

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नांच्या मुसळधारात एक गंभीर मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कॅन्सर निदानासाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हॅनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा जोरदार रंग भरत असताना सभागृहात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे रण उडाले. प्रश्नांचा भडिमार, घोषणांचा गदारोळ आणि मंत्री-खासदारांच्या जाहीर मागण्या यामुळे सभागृहात वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाच्या खरेदीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उठवत, राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

वडेट्टीवार यांनी सभागृहात आवाज उठवत सांगितले की, सरकारने 8 कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदी केल्या. मात्र या व्हॅन अगदी दुप्पट-तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. एका व्हॅनची किंमत 40 लाखांच्या पुढे असू शकत नाही आणि आत बसवले जाणारे उपकरणही 12 लाखांहून अधिक किंमतीचे नाही. तरीसुद्धा यासाठी भरमसाठ रक्कम खर्च करण्यात आली आहे.

Harshwardhan Sapkal : उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे पण घोषणाबाजी गुजरातची

आरोग्याच्या बाबतीत फसवणूक

यावरून त्यांनी सरकारवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत म्हटले की, “कॅन्सरसारखा गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. त्यावरील निदानासाठी ही वाहने घेण्यात आली, पण काही व्हॅनमधील यंत्रे बंद पडलेली आहेत. एवढा पैसा घालवून जर उपकरणेच निकामी असतील, तर ही जनतेच्या पैशांची उधळपट्टीच ठरते. हे फक्त आर्थिक अपव्यवहार नाही, तर आरोग्याच्या बाबतीत जनतेशी केलेली प्रतारणा आहे.

वडेट्टीवार यांनी आक्रमक शैलीत सभागृहाला विचारले, या खरेदीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. मग एवढा वेळ काय चालले आहे? सरकार कोणाला वाचवतंय का? या चौकशीला वेळेची मर्यादा का नाही? त्यांच्या या आक्रमक मागणीनंतर सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सभापतींनी गांभीर्य लक्षात घेत, याप्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश दिले.

Pravin Datke : भूक शमवायला ऑर्डर केला ‘टिफिन’ आला मात्र ‘टकीला’

विरोधकांचा सरकारला इशारा

या व्हॅनमध्ये असणाऱ्या ‘मॅमोग्राफी’ व ‘बायॉप्सी’सारख्या अत्यावश्यक चाचण्या करण्याची क्षमता असते. ग्रामीण भागात कॅन्सर निदानासाठी हे व्हॅन मोठी मदत ठरणार होत्या, असा सरकारचा दावा होता. मात्र वडेट्टीवार यांच्या आरोपांनुसार, या यंत्रांचा दर्जा निकृष्ट असून काही ठिकाणी उपकरणे नादुरुस्त आहेत. सरकारने आरोग्याच्या क्षेत्रात पारदर्शकता आणि तत्पर सेवा देण्याचे वचन दिले होते. मात्र अशा प्रकारच्या खरेदी प्रकरणांमुळे हा विश्वास ढळत चालल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

या मुद्द्यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेच्या नावावर खरेदी घोटाळा म्हणजे हृदयविदारक आहे. या भ्रष्टाचारात दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मंत्र्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा हे अधिवेशन गोंधळातच जाईल, असा इशारा विरोधकांनी दिला आहे. या प्रकरणावर सरकारकडून अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र सभापतींच्या आदेशामुळे आता प्रशासनाच्या हालचालींना गती येणार आहे. चौकशी अहवालात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!