
विधानसभेत रणधीर सावरकर यांनी थैलीसेमियावर ठोस उपायांची मागणी करत माणुसकीचा ठसा उमटवला. रक्ताचं नातं नसतानाही, रक्तासाठी झगडणारा नेता सरकारला कृती करण्यास भाग पाडतोय.
पावसाळी अधिवेशनाचा प्रत्येक दिवस एखाद्या रणभूमीसारखा सभागृहात उभा आहे. अशाच एका लढवय्या आमदाराने सभागृहाच्या शांतपणात एक गहिरा आवाज उठवला. थैलीसेमिया या दुर्धर रक्ताच्या आजारावर ठोस उपाययोजना करण्यासाठी. ज्यांच्याशी रक्ताचा नातं देखील नाही, त्यांच्यासाठी आमदार रणधीर सावरकर लढा देत आहेत. कधी काळी जेव्हा लोक प्रॉपर्टीसाठी रक्ताच्या नात्यांना फाटा देतात, तेव्हा सावरकर त्या बालकांसाठी सरकारला प्रश्न विचारतात, ज्यांच्याशी त्यांचं फक्त एकच नातं आहे, ते म्हणजे माणुसकीचं.
महाराष्ट्रात थैलीसेमिया या दुर्धर अनुवंशिक आजाराने ग्रासलेले 12 हजार पेक्षा जास्त रुग्ण आहेत. ही संख्या केवळ आकड्यांची नाही, ती रोज रक्ताच्या थेंबावर जीव टिकवणाऱ्या लेकरांची आहे. रोज रक्त देणारं कोणी नसलं, की जीवनही ओसाड होतं. सावरकर यांनी हे वेदनादायक वास्तव सरकारसमोर मांडलं. त्यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिलं की, किती वेळ अशी लेकरं रक्ताच्या प्रतीक्षेत राहतील? SOP (मानक कार्यप्रणाली) कधी तयार होईल? प्रतिबंध आणि जनजागृती कधी सुरू होईल?

समुपदेशकांनाही प्रशिक्षण
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावर स्पष्ट केलं की, राज्यात SOP तयार करण्यात आलं आहे. राज्य आरोग्य संस्था (PHI), नागपूरमार्फत जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना ‘Training of Trainers’ अंतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. ARSH, RBSK, Sickle Cell, ICTC योजनेत कार्यरत समुपदेशकांनाही प्रशिक्षण दिलं जात आहे. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांत HPLC तपासण्या, MRI, 2D Echo, CBC, LFT, KFT, Serum Ferritin, TFT यांसारख्या तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर रक्त संक्रमण आणि लोह नियंत्रणासाठी आयर्न चिलेशन गोळ्याही मोफत दिल्या जात आहेत.
सावरकरांना हे पुरेसं वाटलं नाही. कारण त्यांना आकडे पुरेसे नाहीत, त्यांना आधार हवा आहे, हृदयाच्या ठोक्यांतून वाचवलेली माणसं हवी आहेत. त्यांनी मागणी केली की, खासगी रुग्णालयांतही अनिवार्य तपासण्या लागू कराव्यात, विवाहपूर्व तपासण्या बंधनकारक कराव्यात, निदानावर कार्यशाळा आणि समुपदेशन अनिवार्य करावं. कारण एक पिढी निर्माण करण्याचा विचार करायचा असेल, तर पहिल्यांदा ती वाचवावी लागते.
आरोग्य विभागाने सावरकरांच्या आवाजाला उत्तर दिलं आहे. सरकारने SOP तयार केलं, प्रशिक्षण सुरू केलं, तपासण्या मोफत केल्या, पण हे फक्त सुरुवात आहे. थैलीसेमिया मुक्त महाराष्ट्र हा नुसता एक स्वप्न न राहता तो हृदयस्पर्शी वास्तव व्हावा, यासाठी रणधीर सावरकरांनी माणुसकीच्या रक्ताचं पाणी न करता, थेट हृदयाच्या नळीतून आवाज काढला आहे.
Parinay Fuke : सिनेमातील ड्रग्सची पावडर लाईन झाली तरुणाईसाठी डेंजरलाईन