
राजकारणात अनेकजण आश्वासनांची गॅरंटी देतात, पण सुधीर मुनगंटीवार यांनी थेट कोट्यवधींच्या मंजुरीने विकासाची एक्सप्रेस खेचून आणली. बल्लारपूरच्या रस्त्यांपासून नियोजनापर्यंत त्यांच्या नेतृत्वाचा ‘पॉवरफुल्ल’ ठसा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
राजकारणात अनेकजण केवळ आश्वासनांची आतषबाजी करतात, पण काही नेते असतात, जे विकासाला स्वतःची ओळख देतात. बल्लारपूरचे आमदार आणि राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे असेच नेतृत्वाचे पुन्हा जिवंत उदाहरण ठरले आहे. संपूर्ण राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या आठ मोठ्या प्रकल्पांपैकी तब्बल पाच प्रकल्प केवळ बल्लारपूर मतदारसंघासाठी मंजूर होणं, हे त्यांच्या प्रभावी नेतृत्वाचे स्फोटक उदाहरण आहे. हे सर्व प्रकल्प मिळून एकूण 167 कोटी रुपयांच्या निधीतून राबवले जाणार आहे.
ही कामगिरी काही सामान्य नाही. यात केवळ आकडेवारी नाही, तर आहे ठाम मागणी, अभ्यासपूर्ण पाठपुरावा, प्रशासनातील अनुभवाची जाण आणि निर्णयक्षम नेतृत्वशैली. आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने सभागृहात मुद्दा मांडून, थेट मंत्र्यांशी आणि अधिकार्यांशी संवाद साधून हे काम शक्य केलं. त्यामुळेच आज पोंभुर्णा तालुक्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.

Chandrashekhar Bawankule : सरकारनं फोडल्या आता वेळेच्या बेड्या
प्रभावी नेतृत्व
विविध प्रकल्पांमधून मुनगंटीवार यांची कामांची व्याप्ती, दिशा आणि दृष्टी स्पष्टपणे जाणवते. प्रत्येक योजनेमागे एक अभ्यास, एक उद्देश आणि त्या मागे त्यांच्या नेतृत्वाची भक्कम छाया असते. एवढा मोठा निधी खेचून आणण्याचे काम केवळ राजकीय वजनावर होत नाही, तर त्यासाठी लागतो प्रशासनावरचा प्रभाव, खात्यांमधील प्रक्रियेची पूर्ण समज आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी ठाम भूमिका मांडण्याची क्षमता.
या पाच प्रकल्पांमध्ये मरेगाव ते भीमणी फाटा सिमेंट काँक्रीट रस्ता (45 कोटी), आक्सापूर ते चिंतलधाबा रस्ता आणि दोन पूल (50 कोटी). मरेगाव–सोनापूर वळणमार्गासह रस्ता (17 कोटी), कोसारा–नवेगावमोरे मुख्य रस्ता व मोठा पूल (40 कोटी) आणि जुनोना–नवेगावमोरे वळणमार्गाचा प्रकल्प (15 कोटी) यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या मंजुरीमुळे संपूर्ण पोंभुर्णा तालुक्याचे रस्ते जाळे अधिक मजबूत, सुरक्षित आणि दळणवळणसुलभ होणार आहे.
Randhir Sawarkar : रक्ताचं नातं नसतानाही, रक्तासाठी लढा पुकारला
ऐतिहासिक कामगिरी
विकासाचे काम केवळ सडका-रस्त्यांपुरते मर्यादित नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला व्यापक आणि दूरदर्शी दिशा मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वन प्रशासनासाठी प्रबोधिनी, पर्यावरणासाठी बॉटनिकल गार्डन, कॅन्सर हॉस्पिटलसारखी आरोग्य सुविधा, महिला शिक्षणासाठी S.N.D.T. विद्यापीठ केंद्र, तसेच कृषी, पर्यटन, कौशल्यविकास, संशोधन आणि विमान उड्डाण प्रशिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
बल्लारपूर विधानसभा हा आता केवळ मतदारसंघ राहिलेला नाही, तर तो एक विकास मॉडेल म्हणून उभा राहत आहे. रस्ते, हॉस्पिटल्स, उद्योग, शिक्षण संस्था, पर्यावरणीय प्रकल्प आणि रोजगारनिर्मितीची केंद्रे, या साऱ्यांचा संगम आता या भागात पाहायला मिळतो. यामुळे केवळ जिल्ह्याचा चेहरा बदलतो आहे, तर संपूर्ण विदर्भासाठीही एक प्रेरणास्त्रोत निर्माण होत आहे.
शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की, विकास ही केवळ योजना नसते, तो असतो एक दृष्टिकोन. तो दृष्टिकोन सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांची कामगिरी आजही ‘पॉवरफुल्ल’ ठरते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूरने उचललेली ही झेप ही आकड्यांची गोष्ट नसून, ती जनतेच्या विश्वासाची, प्रगतीच्या दिशेने टाकलेली ठोस पावले आहेत.
Sudhir Mungantiwar : इंग्रजीचा मोह ब्रिटिश संसदेपर्यंत पाठवू