
माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या 15 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रकल्पाला मंजुरी देत लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन दिले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक ऐतिहासिक क्षण घडला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे एमआयडीसी निर्माणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि वर्षभरात प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे स्पष्ट आश्वासन उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सभागृहात दिले. गेल्या पंधरा वर्षांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर ठामपणे उभे राहणारे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या लढ्याला अखेर यश लाभले आहे.
संपूर्ण अधिवेशनात हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. आमदार मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाच्या संदर्भातील गेल्या दशकभराच्या हालचाली, अडथळे, कागदोपत्री प्रक्रियेतील गुंतागुंत याचे तपशीलवार चित्र मांडले. एनओसी, नकाशे, नाहरकत प्रमाणपत्र, कालबाह्य अटी व बैठकींची इतिवृत्ते या सर्व टप्प्यांमधून हा प्रस्ताव कसा खेचत आणावा लागला, हे त्यांनी स्पष्ट केले. केवळ मागण्या न करता त्या अंमलात आणण्यासाठी झटणाऱ्या नेतृत्वाची ताकद त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

प्रत्यक्ष पाहणी
यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी चार ठोस मागण्या सरकारपुढे मांडल्या. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग विभागाची विशेष बैठक तत्काळ आयोजित करणे, चंद्रपूरमध्येच ‘राज्य उद्योग मित्र’ नेमणे, मंत्र्यांनी स्वतः चंद्रपूर दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये वाढ करणे. या मागण्यांना मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सभागृहात माहिती दिली की, पोंभूर्णा एमआयडीसीसाठी 102.50 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाला मान्यता मिळाली आहे. यामध्ये 42.59 हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात आली आहे. 2 कोटी 35 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. उर्वरित जमिनींसाठी 33/3 नोटीस बजावण्यात आली आहे आणि ती प्रक्रिया 60 दिवसांत पूर्ण केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय दर आठवड्याला या प्रकल्पाची प्रगती आमदार मुनगंटीवार यांना लेखी स्वरूपात कळवली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
Sudhir Mungantiwar : पाच प्रकल्प, एक विजेता, विकासाच्या मैदानात पॉवरफूल नेता
उद्योगनगरीकडे वाटचाल
शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या दराबाबत लवकरच विशेष बैठक घेण्यात येईल, असे स्पष्ट करत मंत्री इंद्रनील नाईक यांनी पुढील महिन्यात स्वतः चंद्रपूर दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिले. या सर्व घोषणांमुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण तयार झाले. ही केवळ एक प्रकल्पाची घोषणा नव्हे, तर चंद्रपूरच्या औद्योगिक भवितव्याला दिशा देणारा निर्णायक क्षण आहे. मुनगंटीवार यांचा संघर्ष हा केवळ राजकीय नव्हता, तर जिल्ह्याच्या प्रत्येक तरुणाच्या नोकरीसाठी, शेतकऱ्याच्या जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी आणि पोंभूर्णा परिसराला उद्योगनगरी म्हणून घडवण्यासाठीचा होता. आज या प्रयत्नांना सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे, आणि आता हा प्रकल्प प्रत्यक्ष उभारणीच्या टप्प्यात येणार आहे.
पोंभूर्णा एमआयडीसी हे केवळ एक भूखंड नसून चंद्रपूरच्या विकासाचे भविष्य आहे. यामुळे हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, औद्योगिक गती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा चालना मिळेल. ‘पंधरा वर्षांच्या ध्येयवेड्या प्रवासानंतर पोंभूर्णा एमआयडीसीच्या वाटचालीला गती मिळणं, ही केवळ आ. मुनगंटीवार यांचीच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेची जिंकलेली लढाई आहे’ असे स्पष्ट चित्र आता तयार झाले आहे. नेतृत्व जेव्हा निष्ठा आणि दृष्टीकोनाने चालते, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात येतात, पोंभूर्णा एमआयडीसी त्याचे जिवंत उदाहरण आहे.