
हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुन्हा एकदा अस्मितेच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. शब्दांचं शस्त्र धारदार झालं असून राजकारणाच्या रंगमंचावर एक नवा आगीचा खेळ सुरू झालाय.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वणवा पेटला आहे. ‘ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या?’ या खवळलेल्या शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आणि मराठी अस्मितेच्या स्फोटक वादात आणखी भडक दिला आहे. एकीकडे मनसेच्या हाणामारीच्या आरोपांवरून हिंदी भाषिक संतप्त झालेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र येत ‘विजयोत्सव’ साजरा करण्याचा निर्धार केलाय.
नवीन जिंदाल यांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी राज ठाकरेंना थेट सडकछाप गुंड म्हणून संबोधले. एवढ्यावरच न थांबता, राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे गंभीर आरोप करत त्यांनी ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेला तुरुंगाची गरज असल्याचं ठामपणे सांगितलं. राज ठाकरेंमध्ये जर खरोखर हिंमत असेल, तर त्यांनी मुंबईतल्या शांतिदूतांना (हिंदी भाषिक नागरिकांना) मराठी बोलायला लावून दाखवावं, असं खुले आव्हानही त्यांनी दिलं.

रोखठोक इशारा
मराठी-हिंदी वादात आता मुंबईतील उद्योगजगतील लोकही उतरले आहेत. शेअर मार्केट उद्योजक सोशल मीडियाच्या द्वारे राज ठाकरेंना उद्देशून म्हणत आहेत की, आम्ही मराठी शिकणार नाही. 30 वर्षे मुंबईत राहूनही मराठी न येण्याचा अभिमान बाळगणाऱ्या या उद्योजकांनी मनसेच्या वर्तनामुळे मराठी शिकण्याची इच्छा गमावल्याचे जाहीर करत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे सांस्कृतिक दडपशाहीचा आरोप केला आहे.
हिंदी सक्तीचा GR मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत ‘विजयोत्सव’ साजरा करणार आहेत. महाराष्ट्रात भाषा, अस्मिता आणि अधिकार यावरून पुन्हा एकदा वादाचे वादळ उठले असताना ठाकरे बंधूंनी घेतलेला एकत्रित पवित्रा, मराठी जनतेसाठी प्रतीकात्मक विजय ठरतोय. मात्र, याच उत्सवाच्या सावलीत सुरू असलेली अश्लील टीका, धमक्या आणि तुच्छताजनक वक्तव्यांमुळे या विजयाच्या क्षणावर गडद सावली पडतेय.
अस्मितेचा रणसंग्राम
“ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या?” या एका वाक्याने राज्यात मराठी-हिंदी संबंधांवरचं बोट धरलंय. हे केवळ राजकीय वाद नाही, तर अस्मितेचा रणसंग्राम बनू लागला आहे. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप यायची असली तरी, या टिकेचा स्फोटक परिणाम मनसैनिकांच्या भूमिकेवर नक्कीच दिसू शकतो. राजकीय टीका-टिप्पणीच्या सीमारेषा ओलांडल्यावर त्या वैयक्तिक अस्मितेवर घाव घालतात. त्यातून जे नातं निर्माण होतं, ते फक्त राजकारणाचं नसतं, तर संपूर्ण समाजाच्या मनाचा आरसा ठरतं.