महाराष्ट्र

Sulbha Khodke : रोग चढतोय मुळांना, संत्र्यासाठी हाक मंत्र्यांना

Monsoon Session : शेतकऱ्यांसाठी सुलभा खोडके यांचा विधानसभेत आवाज

Author

अमरावतीच्या संत्रा पट्ट्यावर ‘फायटोफ्थोरा’ रोगाचा घातक प्रकोप झाला असून हजारो शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक उध्वस्त झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके यांनी विधानभवनात सरकारकडे तातडीने पंचनामे व मदतीची जोरदार मागणी केली.

अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर ‘फायटोफ्थोरा’ या रोगाने संत्रा बागांचं वंशविच्छेदच केल्यासारखा परिणाम केला आहे. या जीवघेण्या रोगामुळे संत्रा झाडांची मुळे सडून झाडं कोलमडत चालली आहेत आणि हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा गोडवा हरवत आहे. पण आजवर कृषी विभागाकडून पंचनामे नाहीत. मदतीचा शाश्वती नाही आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आशेचा किरणही दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी सरकारकडे तत्काळ मदतीची मागणी करत, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानभवनात पोहोचवला.

अमरावतीतील वरुड, मोर्शी, चांदूरबाजार या भागात संत्रा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. संत्रा हे झाड दर 3 वर्षांनी उत्तम उत्पादन देतं, पण दरवर्षी त्याची निगा राखणे ही शेतकऱ्यांची कसरत असते. यंदा मात्र निसर्ग आणि रोग यांनी हातमिळवणी करत संत्रा बागांना भक्ष्य केलं आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या अनियमित, सततच्या पावसामुळे जमिनीत ‘फायटोफ्थोरा’ या बुरशीजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे संत्र्याचे फळं सडतात, मुळे कुजतात, झाडं कोसळतात, आणि संपूर्ण बाग उध्वस्त होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान

शेतकऱ्यांनी ‘ओलिता’ पद्धतीने पाणी दिल्यावरही, ही बुरशी पाण्यात टिकून राहते आणि जमिनीत ‘डिंका’सारखा चिकट थर तयार होतो. याचा परिणाम म्हणजे शेतीचा बळी आणि शेतकऱ्याचं आर्थिक कंबरडं मोडलं जातं. कायदा सांगतो की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली पाहिजे. पण आजवर कृषी विभागाने ना पंचनामे केलेत, ना एकही शेतकऱ्याला मदतीचा पत्ता लागलाय. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी, अशी विनंती खोडके यांनी केली.

Buldhana : थेंबथेंबासाठी हाक आणि मिशन पाण्यात

या संदर्भात त्यांनी कृषी विभागाला तत्काळ सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा अहवाल तयार करणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे यासाठी अधिकृत पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली. यावर उत्तर देताना कृषी मंत्री अशिष जैस्वाल यांनी सांगितलं की, फायटोफ्थोरा रोगामुळे नुकसान झाल्याची माहिती खरी असली, तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांकडून तक्रार आलेली नाही. ज्या भागांमध्ये नुकसान झालं आहे, तिथे योग्य ती मदत नक्की केली जाईल. म्हणजे सरकारकडे तक्रार गेली नाही, म्हणून मदत नाही, असा शेतकऱ्यांच्या वेदनांवर दुर्लक्ष करणारा यंत्रणांचा प्रतिसाद सध्या पहायला मिळतोय.

संत्रा हा अमरावतीचा श्वास आहे आणि तोच आज संकटात आहे. शासनाच्या यंत्रणा जर वेळेत हालचाल करत नसतील, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची फळं कधीच पुन्हा उमलणार नाहीत. आमदार सुलभाताई खोड़े यांनी घेतलेला पुढाकार हा एक आशेचा किरण आहे. पण त्यामागे शासनाने त्वरित कृती न केल्यास, संत्रा पट्ट्याचं गोडवा कायमचा हरवण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!